त्वचा सुंदर आणि नितळ दिसावी, यासाठी काही जण केवळ ब्युटी प्रोडक्ट्सची मदत घेतात. पण नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलवण्यासाठी पौष्टिक आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. याच पौष्टिकतेमधील एक घटक म्हणजे ‘टोमॅटो’. ज्याच्या अनेक गुणधर्मामुळे आणि पौष्टिकतेमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. टोमॅटोचे सेवन केल्याने केवळ त्वचा निरोगी राहत नाही, तर ते अँटीऑक्सिडंट म्हणून देखील काम करू शकते आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होण्यास मदत होते, असे ओरिफ्लेम इंडियामधील वेलनेस तज्ज्ञ सोनिया नारंग यांचे मत आहे.

सोनिया नारंग यांच्या मते, टोमॅटोमधील गुणधर्म आपल्या त्वचेसाठी सनस्क्रीन प्रमाणे कार्य करतात. यातील पोषक घटक सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. टोमॅटोचे काप चेहऱ्यावर हलक्या हातानं घासल्यास सनटॅनची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळते. तसेच, टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई आणि के ची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्वचा नितळ आणि सुंदर राहण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’चा शरीराला पुरवठा होणे अतिशय आवश्यक आहे.

Photos : मुलींना आईकडून वारशामध्ये मिळते Anxiety; संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

तज्ज्ञांचा सल्ला घेऊन टोमॅटोचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. हा उपाय पूर्णतः नैसर्गिक असल्याने यामुळे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी टोमॅटोचा उपयोग केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराइझर लावावे. टोमॅटोचा आपल्या त्वचेला कशाप्रकारे फायदा होतो हे जाणून घेऊया.

  • टोमॅटोमधील पोषक घटक तेलकट त्वचेसाठी औषधाप्रमाणे कार्य करतात. यातील लायकोपिन हे घटक आपल्या त्वचेसाठी अँटी-ऑक्सिडंट्सच्या स्वरुपात काम करते. यामुळे धूळ-माती, प्रदूषणापासून त्वचेचं संरक्षणही होते. ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘व्हिटॅमिन ई’मुळे त्वचेवर होणारा सीबमचा अतिरिक्त स्त्राव नियंत्रणात येण्यासही मदत मिळते.
  • काही जणांच्या चेहऱ्यावर लहान वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी टोमॅटोचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. टोमॅटोमधील लायकोपिन नावाचा घटक त्वचेवर केरिटीनॉइड्स क्रीमप्रमाणे कार्य करतो. हे त्वचेच्या पेशींचे संरक्षणही करते. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हळूहळू नैसर्गिक चमक दिसू लागते. पण चेहऱ्यावर टोमॅटो लावल्यानंतर लगेचच सूर्यप्रकाशात जाणे टाळा, कारण यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

रात्री प्रकाशात झोपण्याची सवय ठरू शकते अनेक आजारांचे कारण; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

  • टोमॅटो आपल्या चेहऱ्यासाठी अ‍ॅस्ट्रिंजेंटप्रमाणे कार्य करते. टोमॅटोमधील अ‍ॅसिडिक गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील मुरुम, डागांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसंच डेड स्किनची समस्या देखील सहजरित्या कमी होऊ शकते. यामुळे त्वचा चमकदार आणि मऊ होते.
  • टोमॅटोचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास त्वचेवरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.
  • चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी टोमॅटो हे एक अप्रतिम फळ मानले जाते, यामुळे तुमच्या त्वचेच्या प्रभावित भागावर टोमॅटोचा नियमित वापर करा.

महत्त्वाचे म्हणजे, त्वचेला दीर्घकाळासाठी लाभ मिळावेत, यासाठी नैसर्गिक-आयुर्वेदिक उपचारांची मदत घेणे फायदेशीर ठरते. यासाठी आपल्या डाएटमध्ये फळे-भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करा. तुमच्या आहारात टोमॅटोचा दररोज समावेश केल्यास उच्च रक्तदाब होण्याचा धोकाही कमी होतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)