Natural Remedy for Joint Pain: वय फक्त ३०… पण गुडघ्यांत वेदना मात्र साठीतल्यांसारख्या! जिना चढताना त्रास, थोडं चाललं तरी कळा, बसता उठताना कडकपणा अशी स्थिती अनेक तरुणांची झाली आहे. बदलती जीवनशैली, वाढलेलं वजन, दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय आणि व्यायामाचा अभाव, यामुळे सांध्यांवर अतिरिक्त ताण येतो. परिणामी गुडघ्यातील कूर्चा (कार्टिलेज) झिजू लागतो, सूज वाढते आणि वेदना सतत जाणवू लागतात. वेदनाशमक गोळ्या काही काळ आराम देतात; मात्र मूळ समस्या तशीच राहते. मग उपाय काय?
तज्ज्ञांच्या मते, सांध्यांतील सूज आणि वेदना कमी करण्यासाठी आहारातील काही नैसर्गिक घटक उपयुक्त ठरू शकतात. आयुर्वेद व युनानी उपचारपद्धतीतील जाणकार डॉक्टर सलीम जैदी यांच्या मते, गुडघेदुखीवर फक्त वेदनाशमक औषधांवर अवलंबून राहणे योग्य नाही. शरीराला आतून बळ देणारा, सूज नियंत्रणात ठेवणारा आणि हाडांना मजबुती देणारा घटक आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे. हा घटक तुमच्या घरात सहज उपलब्ध असतो; एक साधं पण प्रभावी धान्य!
या धान्यात प्रतिऑक्सिडंट, तंतुमय घटक आणि सूज कमी करणारे गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, शरीरातील दाह कमी करते आणि सांध्यांवरील ताण हलका करण्यास सहाय्यभूत ठरते. विशेष म्हणजे यात मॅग्नेशियम व फॉस्फरससारखी खनिजे असतात, जी हाडे आणि कूर्चा बळकट ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जातात. याचे नियमित सेवन केल्यास सांध्यांमध्ये “ग्रीस” वाढल्यासारखी हालचाल सुलभ होते, कडकपणा कमी होतो आणि सूज आटोक्यात राहते, असे तज्ज्ञ सांगतात.
हे धान्य कसे घ्यावे? सुमारे ५० ग्रॅम किंवा एक मूठ धान्य घ्या. ते एक ग्लास पाण्यात १०-१२ तास भिजत ठेवा. सकाळी हेच पाणी व धान्य एका भांड्यात टाकून १५ मिनिटे उकळा. उकळून झाल्यावर गॅस बंद करा आणि भांडे झाकून ५-६ तास तसेच ठेवा. नंतर पाणी गाळून दिवसातून एकदा हे पाणी प्या. नियमित काही दिवस सेवन केल्यास सांध्यांतील वेदना व सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.
वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, या धान्यातील बीटा-ग्लूकन्स, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस शरीरातील दाह कमी करण्यास हातभार लावतात. हाडांची घनता टिकवून ठेवणे आणि सांध्यांची कार्यक्षमता सुधारण्यास ही खनिजे उपयुक्त मानली जातात. मात्र, सर्वांसाठी हे योग्य असेलच असे नाही. ज्यांना ग्लूटेनची अॅलर्जी आहे किंवा सीलिॲक रोग आहे, त्यांनी याचे सेवन टाळावे. गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी तसेच दीर्घकालीन आजारांवर उपचार घेत असलेल्यांनी वैद्यकीय सल्ल्याविना हे सेवन करू नये.
हे प्रभावी धान्य म्हणजे जव (बार्ली). आपल्या आहारात सहज समाविष्ट करता येणारे जवाचे पाणी, योग्य पद्धतीने व मर्यादित प्रमाणात घेतल्यास, गुडघेदुखी व सूज कमी करण्यासाठी सहाय्यक ठरू शकते. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य सवयींसह हा नैसर्गिक उपाय अवलंबल्यास ३० व्या वर्षीच त्रास देणाऱ्या गुडघ्यांना पुन्हा हालचालींची ताकद मिळू शकते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

