Japanese Secret Of Living Long : चांगली झोप मिळण्यासाठी पुरेसा वेळ झोपणे, शांत, आरामदायी आणि रोज नियमित वेळेवर झोपणे महत्त्वाचे आहे. बहुतेक प्रौढांना साधारणपणे सात ते नऊ तास झोपेची गरज असते आणि तरीही ही गरज व्यक्तीनुसार बदलू शकते. काही लोक कमी झोपेतही दिवसभर अगदी आनंदी राहू शकतात; तर काहींना ताजेतवाने वाटण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी अधिक झोपेची आवश्यकता असते.
‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’च्या आकडेवारीवरून असेही दिसून येते की, विविध देशांमध्ये झोपेच्या कालावधीत तफावत आढळते. उदाहरणार्थ- आशियाई देशांमधील (जसे की जपान, इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स) लोक इतर देशांतील लोकांच्या तुलनेत सरासरी कमी झोपतात. त्याव्यतिरिक्त, ‘calendar-uk.co.uk’ च्या २०२१ मधील एका सर्वेक्षण अहवालानुसार जपानमधील लोक रात्री सरासरी ४७१ मिनिटे म्हणजे जवळपास सात तास ५१ मिनिटे झोपतात. मात्र, कामाच्या दिवसांमध्ये त्यांची झोपण्याची वेळ यापेक्षा थोडी कमी असते.
मग कमी झोप घेऊनही जपानी लोक अधिक निरोगी आयुष्य कसे जगतात?
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने गुरुग्राम येथील आर्टेमिस हॉस्पिटलमधील ‘इंटर्नल मेडिसिन’ विभागाच्या प्रमुख व वरिष्ठ सल्लागार डॉक्टर सीमा धीर यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार- जपानमध्ये लोक सरासरी ६.५ तास झोपतात. त्यांचे झोपेचे हे प्रमाण भारत आणि इतर बहुतेक देशांच्या तुलनेत कमी आहे. मग तरीही तिथले लोक अधिक काळ आणि निरोगी आयुष्य जगतात. त्यामागची काही कारणे खालीलप्रमाणे…
मासे आणि आंबवलेल्या (fermented) पदार्थांवर आधारित आहार
जपानी जेवणात ओमेगा-३ युक्त मासे, ‘नाट्टो’ (natto) व ‘मिसो’ (miso)सारखी सोया उत्पादने, समुद्री शेवाळ (seaweed) आणि ग्रीन टी यांचा समावेश असतो. या पदार्थांचा संबंध हृदयविकार आणि शरीरातील दाह (inflammation) कमी होण्याशी जोडला गेला आहे. मासे आणि सोयामध्ये आढळणारे ओमेगा-३ आणि ‘ट्रिप्टोफॅन’ (tryptophan) हे घटक ‘मेलाटोनिन’ची पातळी वाढवतात, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.
दैनंदिन हालचाल आणि प्रवास
जपानमधील बहुतेक लोक रेल्वेस्थानकापर्यंत चालत जातात आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. त्यामुळे वेगळा व्यायाम न करताही दिवसभरात त्यांचा नकळतपणे हजारो पावले चालण्याचा व्यायाम होतो.
सार्वजनिक ठिकाणी झोपणे
जपानमध्ये रेल्वे किंवा कामाच्या ठिकाणी थोडा वेळ झोपणे सामान्य मानले जाते. रात्री झोप कमी झाली असेल, तर अशी छोटी झोप थकवा कमी करण्यास मदत करू शकते.
रात्री ‘ओफुरो’ (ofuro) स्नान
झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीर शिथिल होते आणि गाढ झोप लागते. परिणामी, कमी तासांची झोपही अधिक फायदेशीर आणि ताजेतवाने करणारी ठरते.
फक्त किती तास झोपता हेच महत्त्वाचे नाही
आरोग्यासाठी फक्त झोपेचा कालावधी पाहणे पुरेसे नाही. त्याऐवजी किती शांत आणि चांगली झोप मिळाली आहे, हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या मते, एखादी व्यक्ती कमी तास झोपत असली तरी सकाळी अगदी ऊर्जेने उठत असेल, रोज ठरलेल्या वेळेत झोपत असेल आणि दिवसभर उत्साही व व्यवस्थितपणे काम करीत असेल, तर तिची झोप चांगली मानली जाऊ शकते. त्याउलट जास्त वेळ झोपूनही वारंवार जाग येत असेल किंवा झोप नीट लागत नसेल, तर त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होत नाही.
झोपेबरोबरच जीवनशैलीच्या महत्त्वावर भर दिला पाहिजे आणि आहार, शारीरिक हालचाल, ताण, मद्यपान, वैद्यकीय समस्या व दैनंदिन दिनचर्या यांचा एकूण आरोग्यावर कसा परिणाम होतो याकडे लक्ष दिले पाहिजे. पाच किंवा नऊ तास अंथरुणात घालवणे, दिवसा सतत झोप येणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे, मोठ्याने घोरणे, वारंवार जाग येणे आणि दिवसभर जागरूक किंवा ताजतवाने राहण्यासाठी चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक यांसारख्या गोष्टींची वारंवार गरज भासणे. ही सर्व लक्षणे तुमच्या झोपेच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे दर्शवून देत असतात.
म्हणूनच फक्त किती तास झोपता हे नाही, तर झोप चांगली आणि शांत लागली आहे का हेही महत्त्वाचे आहे. एखादी व्यक्ती आठ तास अंथरुणावर झोपूनही तिला वारंवार जाग येत असेल, झोप हलकी असेल किंवा स्लीप ॲप्नियासारखी समस्या असेल, तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. चांगली आणि पुरेशी झोप स्मरणशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय, मनःस्थिती, रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाची असते.
