Sleep Stroke Symptoms: ब्रेन स्ट्रोक ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. अनेकांना वाटते की स्ट्रोक अचानक जागेपणीच येतो. मात्र, झोपेत असतानाही ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो. विशेष म्हणजे, काही वेळा व्यक्तीला रात्री झोपताना कोणताही त्रास जाणवत नाही; पण सकाळी उठल्यावर शरीरात काही बदल दिसू लागतात. या प्रकाराला ‘वेक-अप स्ट्रोक’ (Wake-up Stroke) असे म्हणतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
झोपेत असताना ब्रेन स्ट्रोक कसा येतो?
ब्रेन स्ट्रोक कोणत्याही वेळी येऊ शकतो. अगदी रात्री झोपेत असतानाही मेंदूचा झटका येण्याची शक्यता असते. मेंदूपर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी तयार झाल्यास किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटल्यास स्ट्रोक येऊ शकतो. या दोन्ही परिस्थितींमध्ये मेंदूच्या पेशींना नुकसान पोहोचते.
अनेकदा झोपेत असताना स्ट्रोक आल्याचे व्यक्तीला समजत नाही. सकाळी उठल्यानंतर शरीरात होणारे बदल पाहून याची जाणीव होते. उच्च रक्तदाब, मधुमेह, शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित काही आजार यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
याशिवाय धूम्रपान, पुरेसा शारीरिक व्यायाम न करणे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांचाही आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
सकाळी उठल्यावर दिसू शकतात ‘ही’ लक्षणं
झोपेत असताना स्ट्रोक आल्यास सकाळी उठल्यानंतर काही लक्षणे दिसू शकतात. यामध्ये शरीराच्या एका बाजूचा हात किंवा पाय अचानक कमजोर होणे, चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे यांचा समावेश होतो.
काही व्यक्तींना बोलताना अडचण येते किंवा समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजण्यात त्रास होतो. याशिवाय अचानक अंधुक दिसणे, चक्कर येणे, चालताना शरीराचा तोल जाणे अशी लक्षणेही दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये अचानक तीव्र डोकेदुखीचाही त्रास होतो.
सकाळी उठल्यानंतर अशी लक्षणे दिसल्यास केवळ थकवा किंवा झोप पूर्ण न झाल्यामुळे असे होत आहे, असा विचार करू नका. ही स्ट्रोकची धोक्याची चिन्हे असू शकतात.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणं दिसल्यास काय करावं?
एखाद्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर स्ट्रोकची लक्षणे जाणवल्यास वेळ न घालवता तातडीने रुग्णालयात घेऊन जावे. डॉक्टरांना रुग्ण शेवटचा निरोगी कधी दिसला होता आणि सकाळी उठल्यानंतर कोणती लक्षणे जाणवली, याची माहिती देणे महत्त्वाचे आहे.
ब्रेन स्ट्रोकच्या उपचारांमध्ये वेळेला खूप महत्त्व असते. काही रुग्णांमध्ये मेंदूतील रक्ताची गुठळी काढण्यासाठी किंवा मेंदूपर्यंत रक्तपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष उपचार केले जातात. मात्र, कोणता उपचार करायचा हे डॉक्टर तपासणीनंतरच ठरवतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाला स्वतःहून कोणतेही औषध देऊ नका. कारण मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे होणारा स्ट्रोक आणि रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे होणारा स्ट्रोक यांचे उपचार वेगवेगळे असतात.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
