Eating Late At Night Causes Silent Reflux: अॅसिडिटी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर छातीत होणारी जळजळ किंवा आंबट ढेकर येण्याचं चित्र उभं राहतं. मात्र, अॅसिड रिफ्लुक्सची लक्षणं नेहमी पोटाशी संबंधितच असतात असं नाही. काही वेळा पोटातील आम्ल वर येऊन घसा आणि स्वरयंत्राला त्रास देऊ शकतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर घसा खवखवणे, सतत खोकला येणे, वारंवार घसा साफ करावा लागणे किंवा आवाज बसणे यामागेही अॅसिड रिफ्लक्स कारणीभूत असू शकतो. या प्रकाराला लॅरिंगोफॅरिंजियल रिफ्लक्स (LPR) किंवा ‘सायलेंट रिफ्लुक्स’ असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे, यामध्ये काही लोकांना नेहमीची छातीत जळजळ जाणवतही नाही.
अॅसिड रिफ्लुक्समुळे घशाचा त्रास कसा होतो?
पोटातील आम्ल किंवा पचनाशी संबंधित पदार्थ अन्ननलिकेतून वर येऊन घसा आणि स्वरयंत्रापर्यंत पोहोचल्यास तेथील नाजूक ऊतींना त्रास होऊ शकतो. अन्ननलिकेच्या तुलनेत घसा आणि स्वरयंत्राला आम्लापासून संरक्षण कमी असल्याने वारंवार होणाऱ्या रिफ्लक्समुळे तिथे चिडचिड निर्माण होऊ शकते.
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. व्यंकटेश रेड्डी राय यांच्या मते, अॅसिड रिफ्लक्स म्हणजे फक्त छातीत जळजळ असा समज अनेकांमध्ये आहे. काही रुग्ण अनेक महिने ENT डॉक्टरांकडे उपचार घेतात किंवा खोकल्याची औषधं आणि घशाच्या गोळ्या घेत राहतात; मात्र त्यांच्या घशातील त्रासामागे पोटातील आम्ल असू शकतं, याची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे सतत घसा खवखवणे, हट्टी खोकला, वारंवार घसा साफ करण्याची गरज, आवाज बसणे किंवा वारंवार दुर्गंधीयुक्त श्वास यांसारखी लक्षणं दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
‘सायलेंट रिफ्लुक्स’ची कोणती लक्षणं दिसू शकतात?
अॅसिड रिफ्लुक्सची लक्षणं व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात. त्यापैकी काही प्रमुख लक्षणं अशी—
- सकाळी उठल्यावर घसा दुखणे किंवा खवखवणे
- सतत किंवा वारंवार कोरडा खोकला येणे
- वारंवार घसा साफ करण्याची इच्छा होणे
- आवाज बसणे किंवा आवाजात बदल जाणवणे
- घशात काहीतरी अडकल्यासारखं किंवा गोळा असल्यासारखं वाटणे
- वारंवार तोंडाची दुर्गंधी येणे
- आंबटपणा किंवा अॅसिडिटीची लक्षणं
- झोपेत किंवा रात्री त्रास वाढणे
मात्र, ही सर्व लक्षणं केवळ अॅसिड रिफ्लक्समुळेच होतात असं नाही. अॅलर्जी, सायनसचा त्रास, दमा, संसर्ग आणि काही औषधांमुळेही अशीच लक्षणं दिसू शकतात.
रात्री अॅसिड रिफ्लुक्स का वाढू शकतो?
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. सुश्रुता सी.एस. यांच्या मते, जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यास पोटातील पदार्थ वरच्या दिशेने जाण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे काही लोकांमध्ये सकाळच्या वेळी लक्षणं अधिक जाणवतात.
या सवयींमुळे त्रास वाढू शकतो…
- रात्री उशिरा जेवण करणे
- जेवल्यानंतर लगेच झोपणे
- रात्री खूप जड किंवा तेलकट पदार्थ खाणे
- झोपण्यापूर्वी वारंवार स्नॅक्स खाणे
- कॅफिनचे अतिसेवन
- मद्यपान आणि धूम्रपान
- वजन वाढणे किंवा लठ्ठपणा
- तणाव
- जेवणाच्या अनियमित वेळा
अॅसिड रिफ्लुक्सपासून आराम मिळवण्यासाठी काय कराल?
काही लोकांमध्ये जीवनशैलीत छोटे बदल केल्याने रिफ्लक्सचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
रात्री लवकर जेवा: झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
जेवल्यानंतर लगेच झोपू नका: जेवल्यानंतर काही काळ सरळ स्थितीत राहणं फायदेशीर ठरू शकतं.
ट्रिगर होणारे पदार्थ ओळखा: कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास वाढतो याची नोंद ठेवा.
वजन नियंत्रणात ठेवा: जास्त वजन असल्यास रिफ्लक्सचा धोका वाढू शकतो.
झोपताना डोक्याचा भाग उंच ठेवा: रात्री त्रास होत असल्यास काही लोकांना यामुळे आराम मिळू शकतो.
स्वतःहून औषधं दीर्घकाळ घेऊ नका: सतत होणाऱ्या त्रासामागचं मूळ कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.
‘ही’ लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या
सतत खोकला, घसा दुखणे किंवा तोंडाची दुर्गंधी म्हणजे अॅसिड रिफ्लक्सच असेल असं नाही. त्यामुळे वारंवार होणाऱ्या त्रासावर स्वतःहून दीर्घकाळ औषधं घेण्याऐवजी डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
गिळताना त्रास होणे, कारण नसताना वजन कमी होणे, वारंवार उलट्या होणे, उलटीत किंवा शौचात रक्त दिसणे, छातीत दुखणे, झोप वारंवारमुळे खंडित होणे किंवा लक्षणं सतत वाढत जाणे अशी चिन्हं दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेण्यास विलंब करू नका.
छातीत जळजळ होत नाही म्हणून अॅसिड रिफ्लक्स नाही, असं समजू नका. सकाळचा घसा खवखवणे, सतत खोकला, आवाज बसणे किंवा वारंवार घसा साफ करावा लागणे यामागे ‘सायलेंट रिफ्लक्स’सह अनेक कारणं असू शकतात. योग्य कारण शोधून त्यावर उपचार करणं हेच दीर्घकाळ आराम मिळवण्याचं महत्त्वाचं पाऊल आहे.
