Sleeping with Contact Lenses Eye Infection Risk: कॉन्टॅक्ट लेन्समुळे चष्म्याशिवाय स्पष्ट दिसण्याची सोय होते. त्यामुळे अनेक जण दिवसभर नियमितपणे कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात. मात्र थकवा, उशिरा घरी येणे किंवा घाईगडबडीत अनेकदा लेन्स काढायचे राहून जाते आणि व्यक्ती लेन्स घालूनच झोपी जाते. ही चूक वरकरणी छोटी वाटत असली तरी डोळ्यांसाठी त्रासदायक ठरू शकते. दररोज वापरण्यासाठी तयार केलेले कॉन्टॅक्ट लेन्स रात्री घालून झोपणे टाळणे महत्त्वाचे आहे. रात्रीच्या वेळी लेन्स बराच वेळ डोळ्याच्या कॉर्नियाच्या संपर्कात राहतो. त्यामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक वातावरण आणि ऑक्सिजनचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. काही परिस्थितींमध्ये डोळ्यांच्या संसर्गाचा धोकाही वाढू शकतो.
रात्री कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपल्याने नेमकं काय होतं?
कॉर्निया म्हणजे डोळ्याच्या पुढील बाजूचा पारदर्शक थर. हा निरोगी राहण्यासाठी ऑक्सिजन आणि अश्रूंच्या नैसर्गिक थराची गरज असते. कॉन्टॅक्ट लेन्स कॉर्नियाच्या पृष्ठभागावर बसत असल्याने त्याचा ऑक्सिजनचा पुरवठा आणि अश्रूंची देवाणघेवाण प्रभावित होऊ शकते. झोपताना डोळे बंद असतात आणि लेन्स अनेक तास डोळ्याच्या पृष्ठभागावरच राहतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा, जळजळ, लालसरपणा किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
सर्वात महत्त्वाची चिंता म्हणजे संसर्ग. लेन्सच्या पृष्ठभागावर सूक्ष्मजीव जमा होण्याची शक्यता असते. डोळ्याच्या पृष्ठभागावर किरकोळ इजा किंवा जळजळ असल्यास या सूक्ष्मजीवांमुळे मायक्रोबियल केराटायटिससारखा गंभीर संसर्ग होऊ शकतो.
मायक्रोबियल केराटायटिस म्हणजे काय?
मायक्रोबियल केराटायटिस हा कॉर्नियामध्ये होणारा संसर्ग आहे. कॉन्टॅक्ट लेन्सचा चुकीचा किंवा अतिवापर हा त्यासाठी एक महत्त्वाचा जोखीम घटक मानला जातो. काही संशोधनांमध्ये रात्री कॉन्टॅक्ट लेन्स घालून झोपणे आणि मायक्रोबियल केराटायटिसचा वाढलेला धोका यांच्यात संबंध आढळला आहे. एका अभ्यासात रात्री लेन्स घालून झोपणाऱ्या व्यक्तींमध्ये या संसर्गाचा धोका सुमारे ५.४ पट अधिक आढळला. अन्य संशोधनातही रात्री लेन्स वापरणे आणि संसर्गाच्या वाढलेल्या जोखमीमध्ये संबंध आढळला आहे.
डोळ्यांमध्ये कोणती लक्षणे दिसली तर सावध व्हाल?
कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यानंतर खालीलपैकी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- डोळ्यांमध्ये सतत जळजळ होणे
- डोळे लाल होणे
- डोळ्यांतून जास्त पाणी येणे
- डोळ्यांत चिकट स्राव जाणवणे
- धूसर किंवा अस्पष्ट दिसणे
- डोळ्यात वेदना होणे
- लेन्स घातल्यावर असह्य अस्वस्थता जाणवणे
डोळ्यात वेदना, लालसरपणा आणि दृष्टी धूसर होणे अशी लक्षणे एकत्र दिसत असतील तर स्वतःहून उपचार करण्याऐवजी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना ‘या’ चुका टाळा
१. लेन्स घालून झोपू नका- डॉक्टरांनी रात्री वापरण्यासाठी परवानगी दिली नसेल तर झोपण्यापूर्वी कॉन्टॅक्ट लेन्स काढा.
२. लेन्स हाताळण्यापूर्वी हात धुवा- लेन्स काढण्यापूर्वी किंवा घालण्यापूर्वी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा आणि हात पूर्णपणे कोरडे करा.
३. पाण्यापासून लेन्स दूर ठेवा- शॉवर घेताना, पोहताना किंवा हॉट टबमध्ये असताना कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळा. पाण्यातील सूक्ष्मजीव डोळ्यांपर्यंत पोहोचून संसर्गाचा धोका वाढवू शकतात.
४. लेन्स ठरलेल्या वेळेनुसार बदला- डिस्पोजेबल लेन्स पुन्हा वापरू नका. रियूजेबल लेन्स असल्यास डॉक्टर किंवा उत्पादकाने सांगितलेल्या कालावधीनुसार ते बदला.
५. लेन्स सोल्युशनचा चुकीचा वापर करू नका- जुने सोल्युशन पुन्हा वापरणे किंवा जुन्या सोल्युशनवर नवीन सोल्युशन ओतणे टाळा. लेन्स केसचीही नियमित स्वच्छता आणि योग्य वेळी बदल करणे महत्त्वाचे आहे.
डोळ्यांची काळजी घ्या, छोटी चूक टाळा
कॉन्टॅक्ट लेन्स हा चष्म्याला सोयीस्कर पर्याय असला तरी त्याचा योग्य वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ‘आज फक्त एकदाच लेन्स घालून झोपतो’ असा विचारही डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. डॉक्टरांनी परवानगी दिलेली नसताना रात्री लेन्स घालून झोपणे टाळणे सुरक्षित ठरते. डोळ्यांत वेदना, लालसरपणा, जळजळ, पाणी येणे, चिकट स्राव किंवा दृष्टी धूसर होणे अशी लक्षणे जाणवल्यास कॉन्टॅक्ट लेन्स काढून लवकरात लवकर नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
