Cancer Risk Warning: रात्रीची वेळ म्हणजे शरीर आणि मेंदूला विश्रांती देण्याची वेळ. दिवसभराच्या धावपळीनंतर आपण झोपतो आणि शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहतात. त्यामुळे रात्रीची झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र, झोपण्यापूर्वी आपण नकळत केलेली एक साधी चूक या विश्रांतीच्या वेळेत अडथळा निर्माण करू शकते.
विशेष म्हणजे ही सवय आजकाल इतकी सामान्य झाली आहे की, अनेकांना ती चुकीची आहे, असेही वाटत नाही. उलट झोपताना ही गोष्ट आपल्या अगदी जवळ असणे अनेकांना सुरक्षित आणि सोईचे वाटते. मात्र, कर्करोगतज्ज्ञ डॉ. तरंग कृष्णा यांनी या सवयीबाबत सावध केले आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी तुमचीही हीच सवय चालू ठेवत असाल, तर हा इशारा नक्की जाणून घ्या.
रात्रीची नेमकी कोणती चूक?
रात्री झोपताना आपल्याजवळ ठेवली जाणारी ही गोष्ट इतकी नेहमीची आहे की, तिच्याशिवाय झोपण्याची कल्पनाही अनेकांना कठीण वाटते. झोपण्यापूर्वी काही वेळ तिचा वापर करणे, त्यानंतर ती उशीजवळ ठेवणे आणि सकाळी उठल्यावर पुन्हा सर्वांत आधी तिच्याकडे पाहणे, अशी अनेकांची दिनचर्या झाली आहे.
होय, आपण बोलत आहोत मोबाईलबद्दल…
डॉ. तरंग कृष्णा यांनी समाजमाध्यमांवरील एका पोस्टमधून रात्री झोपताना मोबाईल डोक्याजवळ किंवा उशीशेजारी ठेवण्याच्या सवयीबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या मते, मोबाईल शरीराच्या अगदी जवळ ठेवण्याची सवय टाळणे चांगले.
मोबाईलमधून निघणाऱ्या EMF किरणोत्सर्गाबाबत काय सांगितले जाते…?
मोबाईलमधून रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजेच विद्युतचुंबकीय किरणोत्सर्ग उत्सर्जित होतो. मोबाईल शरीराच्या अगदी जवळ ठेवला, तर या किरणोत्सर्गाचा आपल्याशी संपर्क वाढतो, अशी चिंता काही तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते.
डॉ. तरंग कृष्णा यांनी या पार्श्वभूमीवर रात्री झोपताना मोबाईल उशीजवळ न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी या सवयीचा कर्करोग आणि मेंदूतील गाठींच्या धोक्याशी संबंध असल्याचे नमूद केले आहे.
मात्र, येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. मोबाईलमधून होणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी किरणोत्सर्गामुळे थेट कर्करोग होतो, असा ठोस वैज्ञानिक निष्कर्ष सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टरांनी व्यक्त केलेला इशारा आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले तथ्य यामध्ये फरक करणे आवश्यक आहे.
मात्र झोपेवर होऊ शकतो विपरीत परिणाम
मोबाईलचा रात्रीच्या वापराशी संबंधित अधिक स्पष्ट चिंता म्हणजे झोपेवर होणारा विपरीत परिणाम. झोपण्यापूर्वी बराच वेळ मोबाईल पाहिल्यामुळे शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो.
मोबाईलच्या पडद्यातून येणारा निळा प्रकाश मेंदूला जागृत ठेवण्यास हातभार लावू शकतो. त्यामुळे झोपण्याची वेळ झाली तरी लगेच झोप न लागणे, रात्री उशिरापर्यंत जागरण होणे किंवा सकाळी उठल्यानंतरही ताजेतवाने न वाटणे अशा समस्या जाणवू शकतात.
मिनीटभरासाठीचा मोबाईल तासभर हातात राहतो!
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर थोडेसे काही पाहू, असा विचार करून अनेक जण समाजमाध्यमे स्क्रोल करण्यास सुरुवात करतात. मात्र, एक व्हिडीओ, त्यानंतर दुसरा व्हिडीओ, संदेश, बातम्या आणि विविध पोस्ट पाहता पाहता बराच वेळ निघून जातो.
अशामुळे झोपेची वेळ पुढे ढकलली जाते. सातत्याने अशी सवय राहिल्यास झोपेची गुणवत्ता आणि दैनंदिन कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
मग काय करावे?
झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईलचा वापर बंद करण्याचा प्रयत्न करा. मोबाईल उशीजवळ ठेवण्याऐवजी तो पलंगापासून थोडा दूर ठेवा. अलार्मसाठी मोबाईलचा वापर करत असाल, तरी तो डोक्याजवळ ठेवण्याची गरज नाही.
या वेळेत पुस्तक वाचणे, कुटुंबीयांशी संवाद साधणे, शांत संगीत ऐकणे किंवा ध्यानधारणा करणे, असे पर्याय निवडता येतील.
थोडक्यात, रात्री झोपताना आपण सहजपणे करीत असलेली ही छोटी सवय बदलणे आपल्या झोपेसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते. मात्र, मोबाईलमुळे थेट कर्करोग होतो, असा निष्कर्ष काढण्यापूर्वी उपलब्ध वैज्ञानिक पुरावे आणि तज्ज्ञांचे मत लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
(टीप : हा लेख सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. कोणत्याही आरोग्यविषयक समस्या किंवा शंकेसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
