Mobile Radiation Cancer Risk: भारतामध्ये अनेक लोक झोपण्याआधी मोबाईल स्क्रोल करतात किंवा फोन उशाजवळ ठेवूनच झोपतात. ही सवय आता खूप सामान्य झाली आहे. पण, याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो का?

Los Angeles, California येथील अ‍ॅनेस्थेसियोलॉजिस्ट डॉ. मायरो फिगुरा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबाबत इशारा दिला आहे. त्यांनी नेमकं काय सांगितलं आणि खरंच यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो का ते जाणून घेऊया.

खरंच यामुळे कॅन्सर होऊ शकतो का? खरंच मोबाईल आरोग्यावर परिणाम करू शकतो का?

डॉ. मायरो फिगुरा यांचं म्हणणं आहे की, झोपताना फोन डोक्याजवळ ठेवणं योग्य नाही. त्यांच्या मते, “जर तुम्ही फोन अगदी डोक्याजवळ ठेवून झोपत असाल तर ही सवय बदलायला हवी. फोन वापरत नसतानाही तो रेडिएशन सोडत असतो; यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होऊ शकते, डोकेदुखी होऊ शकते आणि दीर्घकाळात कॅन्सरचा धोका वाढू शकतो.”

नॉन-आयोनाइजिंग रेडिएशन

रेडिएशनबद्दल ते स्पष्ट सांगतात की, मोबाईलमधून निघणारं रेडिएशन “नॉन-आयोनाइजिंग रेडिएशन” असतं. हे आयोनाइजिंग रेडिएशनसारखं नसतं, जसं की सूर्याच्या किरणांमधील रेडिएशन, मेडिकल टेस्ट किंवा रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थांमधील रेडिएशन. ते थेट डीएनएला नुकसान करत नाही.

पण, तरीही हे रेडिएशनच्या प्रकारात येतं. म्हणूनच World Health Organization (WHO) ने याला “माणसांसाठी संभाव्य कॅन्सरकारक” अशा श्रेणीत ठेवले आहे. याच श्रेणीत कॉफी आणि लोणच्यासारख्या काही गोष्टींचाही समावेश होतो.

डॉ. मायरो फिगुरा असंही सांगतात की, धोका फक्त रेडिएशनपुरता मर्यादित नाही. अनेक वेळा चार्जिंग करताना फोन जास्त गरम होतो आणि त्यामुळे आग लागण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. त्यामुळे झोपताना फोन खूप जवळ ठेवणं सुरक्षित मानलं जात नाही.

त्यांचा साधा सल्ला असा आहे की फोन बेडपासून दूर ठेवा. शक्य असेल तर तो खोलीच्या दुसऱ्या बाजूला ठेवा. यामुळे झोप चांगली लागेल आणि पुढे जाऊन आरोग्यावर होणारे संभाव्य धोकेही कमी होऊ शकतात.

बाकी तज्ज्ञ काय म्हणतात?

कोलकाता येथील Apollo Cancer Centre मध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजी कन्सल्टंट डॉ. अरुंधती डे सांगतात की, आतापर्यंत असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा मिळालेला नाही, ज्यामुळे हे सिद्ध होतं की मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिओफ्रीक्वेन्सी लहरींमुळे ब्रेन ट्यूमर किंवा कॅन्सर होतो.

त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे, “आतापर्यंत हे सिद्ध झालेलं नाही की मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिओफ्रीक्वेन्सी वेव्ह्समुळे ब्रेन ट्यूमर किंवा कॅन्सर होतो.” जगभरात मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकाळ मोबाईल वापरावर संशोधन सुरू आहे, पण सध्याच्या आकडेवारीनुसार फक्त डोक्याजवळ फोन ठेवून झोपल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो, असं ठामपणे सांगता येत नाही.

डॉक्टरांच्या मते, याचा सर्वात जास्त परिणाम झोपेवर होतो. आजकालचे स्मार्टफोन सतत लाईट, नोटिफिकेशन, अलर्ट, व्हायब्रेशन आणि स्क्रीनची चमक देत असतात. तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही तरीही मेंदू हे सिग्नल सतत घेत राहतो, त्यामुळे फोन जवळ ठेवल्याने झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते.