मेंदूची शस्त्रक्रिया सुलभ करणारी स्मार्ट सुई वैज्ञानिकांनी तयार केली असून तिच्यात लहान कॅमेराही आहे. यात मेंदूला इजा न करता सुरक्षित शस्त्रक्रिया शक्य आहे. यात मेंदूची बायॉप्सी करताना चित्रणही केले जाते. शल्यविशारदाला मेंदूतील रक्तवाहिन्या दिसत असतात, त्यामुळे घातक रक्तस्राव टाळला जातो. ही स्मार्ट सुई आहे व त्यात फायबर ऑप्टिक कॅमेरा लावलेला आहे, तो मानवी केसाइतका बारीक आहे. यातील चमकदार अवरक्त किरणांनी रक्तवाहिन्या व्यवस्थित दिसतात, त्यामुळे इजा टाळता येते, असे अ‍ॅडलेड विद्यापीठाचे रॉबर्ट मॅकलॉलिन यांनी सांगितले. यात संगणकाचाही वापर असून रक्तवाहिन्या संगणकावर दिसत असतात. गेल्या सहा महिन्यांत बारा रुग्णांवर या सुईचा वापर केला आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियातील सर चार्लस गेर्डनर रुग्णालयात या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वैद्यकीय चाचण्यांसाठी ही सुई सज्ज आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यक उपकरण उत्पादकांशी त्याबाबत चर्चा करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. आतापर्यंत मेंदूच्या शस्त्रक्रियेत जे धोके होते ते या सुईमुळे दूर होणार आहेत.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)