Smriti Irani Soup Recipe: आजकाल अनेक महिला आणि तरुणींमध्ये सतत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, काम करताना दम लागणे किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. अनेकदा या त्रासामागचं मुख्य कारण असतं शरीरातील रक्ताची कमतरता. वैद्यकीय भाषेत यालाच ॲनिमिया, असं म्हटलं जातं. शरीरात पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबिन नसल्यास पेशींना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे व्यक्ती कायम थकलेली, अशक्त आणि निरुत्साही वाटू शकते.
याच समस्येबाबत भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी काही काळापूर्वी एक खास घरगुती उपाय सांगितला होता. विशेष म्हणजे हा उपाय कोणतेही महागडे सप्लिमेंट, औषध किंवा परदेशी सुपरफूड नसून आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणाऱ्या काही साध्या पदार्थांपासून तयार केला जातो. स्मृती इराणी यांच्या मते, हे सूपपदार्थ नियमित आहारात घेतल्यास शरीराला लोह मिळण्यास मदत होऊ शकते आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठीही तो उपयुक्त उपाय ठरू शकतो.
स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, अनेक महिला त्यांच्याकडे ॲनिमिया आणि रक्ताच्या कमतरतेच्या तक्रारींबाबत बोलतात. त्यावेळी त्या एक खास सूप बनवण्याचा सल्ला देतात. हे सूप इतकं पौष्टिक मानलं जातं की, अनेक शाकाहारी लोकांसाठी ते लोहाचा उत्तम स्रोत ठरू शकतं.
मात्र, हे सूप नेमकं कोणतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्याचं उत्तर आहे शेवग्याच्या शेंगा आणि मसूर डाळ यांच्यापासून बनवलं जाणारं पौष्टिक सूप.
शेवगा हा अनेक भारतीय घरांमध्ये वापरला जाणारा पदार्थ आहे. त्याच्या शेंगांमध्ये लोह, क जीवनसत्त्व आणि इतर अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. विशेष म्हणजे क जीवनसत्त्व शरीराला लोह अधिक प्रभावीपणे शोषून घेण्यास मदत करतं. दुसरीकडे मसूर डाळ ही वनस्पतीजन्य प्रथिने आणि लोहाचा चांगला स्रोत मानली जाते. या दोन्ही पदार्थांची जोड शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते.
स्मृती इराणी यांच्या मते, आले, लसूण, हळद आणि इतर काही साध्या घटकांसोबत हे सूप तयार केल्यास त्याची पौष्टिकता आणखी वाढते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते आणि थकवा कमी होण्यासही हातभार लागू शकतो.
सूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
- शेवग्याच्या ३ ते ४ शेंगा
- मूठभर मसूर डाळ
- १ छोटा कांदा
- १ टोमॅटो
- आल्याचा छोटा तुकडा
- २ ते ३ लसूण पाकळ्या
- फरसबीच्या काही शेंगा
- चवीनुसार सैंधव मीठ
- काळी मिरी पूड
- हळद
- चिमूटभर तिखट
- आवश्यकतेनुसार पाणी
कृती
सर्वप्रथम कांदा, टोमॅटो, आले व लसूण साधारण चिरून घ्या. त्यानंतर कुकर किंवा जाड बुडाच्या भांड्यात शेवग्याच्या शेंगा, मसूर डाळ आणि चिरलेले सर्व पदार्थ एकत्र घाला. त्यात फरसबीच्या शेंगाही टाका.
आता हळद, सैंधव मीठ आणि थोडंसं तिखट घालून मिश्रणात पुरेसं पाणी घाला. हे सर्व साहित्य चांगलं शिजू द्या. कुकर वापरत असाल, तर दोन ते तीन शिट्ट्या पुरेशा ठरू शकतात.
साहित्य व्यवस्थित शिजल्यानंतर तुम्ही हे मिश्रण गाळून स्वच्छ रसासारखं सूप तयार करू शकता. किंवा मसूर डाळ आणि इतर घटक एकजीव करून अधिक घट्ट सूपही बनवू शकता. शेवटी त्यावर ताजी काळी मिरी पूड भुरभुरवा आणि गरमागरम सूप पिण्याचा आनंद घ्या.
सततचा थकवा, अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिन कमी असल्याची चिंता असेल, तर स्मृती इराणी यांच्या घरी बनवलं जाणारं हे साधं, पण पौष्टिक सूप एकदा नक्की करून पाहा. स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या पदार्थांपासून तयार होणारं हे सूप शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करू शकतं. मात्र, कोणतीही गंभीर आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
