Soaked Raisins Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुकांचे पाणी पिणे हा एक पारंपरिक आणि लोकप्रिय घरगुती उपाय आहे, जो अनेक लोक आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवतात. पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हे फायदेशीर मानले जाते. भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधिका आणि टीव्ही व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. हंसा योगेंद्र यांच्या मते, रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मनुका सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने आणि ते पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्यांवर मदत होऊ शकते. भिजवल्यामुळे मनुके मऊ होतात आणि त्यातील पाण्यात विरघळणारी पोषक तत्वे बाहेर पडू शकतात. फायबरने समृद्ध असलेल्या मनुक्यांचे सेवन केल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेवर उपचारातही मदत होते.

मनुके नक्कीच पौष्टिक असतात, पण त्यात भरपूर नैसर्गिक साखर आणि कॅलरीजदेखील असतात. त्यामुळे त्याचे अतिसेवन करू नये. साधारणपणे १० ते १५ मनुके सुरूवातीला घेऊ शकता. हे प्रमाण व्यक्तीचे वय, आहार आणि आरोग्य स्थितीनुसार बदलू शकते. तर मग जाणून घेऊया दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्यांचे पाणी प्यायल्यास काय आरोग्यदायी फायदे काय आहेत…

पचनासाठी वरदान आहे मनुक्याचं पाणी

मनुक्यांमध्ये फायबर असते, ते पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते आणि पोट साफ होण्यास मदत करते. भिजवलेले मनुके खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. मनुक्यांचे फक्त पाणी पिण्यापेक्षा फायबर मिळवण्यासाठी मनुके खाणे हा एक चांगला मार्ग आहे. जर्नल ऑफ अॅग्रीकल्चरल अँड फूड केमिस्ट्री आणि फायटोथेरपी रिसर्च मध्येप्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मनुक्यांमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य दोन्ही प्रकारचे फायबर असते. ते आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. फायबरयुक्त मनुक्यांचे सेवन केल्यास पोट साफ होण्यात मदत होते.

गॅस, अॅसिडिटीपासून आराम

मनुक्यांमध्ये असलेले फायबर आणि नैसर्गिक शुगर अल्कोहोल सॉर्बिटॉल शौचास नरम करू शकतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा अर्थात गॅस, अॅसिडिटीसारखा त्रास असलेल्या लोकांसाठी नियमितपणे पुरेशा प्रमाणात मनुक्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

लोहाचा उत्तम स्त्रोत

मनुक्यांमध्ये लोह असते आणि त्यांच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. मात्र त्याला अॅनिमियावरील उपाय ठरू शकत नाही. USDA नॅशनल न्यूट्रिएंट डेटाबेसच्या माहितीनुसार, १०० ग्रॅम मनुक्यांमध्ये सुमारे १.८ ते २.६ मिग्रॅ न-हीम लोह असते. ते शरारीतील लोहाची कमतरता भरून काढते. लोहाची कमतरता किंवा हिमोग्लोबिन कमी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि गरजेनुसार त्यासाठी औषधे घेणे आवश्यक अशू शकते.

त्वचेसाठी फायदेशीर

मनुक्यांमध्ये पॉलीफेनॉल आणि इतर अँटीऑक्सिडंट संयुगे असतात. ही संयुगे शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवण्यात भूमिका बजावतात. फूड रिसर्च इंटरनॅशनल आणि न्यूट्रिएंट्स यामध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार, सुक्या मनुक्यांमध्ये फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्स मोठ्या प्रमाणाच असते. हे अँटीऑर्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींचे नुकसान कमी करतात.

लिव्हरसाठी फायदेशीर

मनुक्याच्या पाण्यात नैसर्गिक नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात. ते लिव्हर स्वच्छ करण्यास आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत करतात.

मनुक्याचे पाणी कसे तयार करायचे?

१५ ते २० मनुके स्वच्छ धुवून ते अर्धा कप स्वच्छ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी प्या आणि भिजवलेले मनुके खा. फायबर आणि इतर पोषक तत्वे मिळवण्याचा हा सोपा उपाय आहे. तुम्ही पाणी उकळूनही मनुके खाऊ शकता. सुमारे २० ते ३० मनुके पाण्यात काही मिनिटे उकळा आणि ते थंड होऊ द्या. नंतर पाणी गाळून प्या.

मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कॅलरजी असतात. त्यामुळे डायबिटीज किंवा ब्लड शुगरचा त्रास असलेल्या लोकांनी ते प्रमाणात खावेत किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.