Soaked vs Unsoaked Walnuts Which Is Healthier: सकाळी उठल्यानंतर भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाण्याची सवय अनेकांना असते. आरोग्याची काळजी घेणारे काही जण अक्रोड रात्रभर पाण्यात भिजत ठेवतात, तर काही जण ते सुकेच खातात. अक्रोड खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारण्यास, हृदयाची काळजी घेण्यास आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते. मात्र, अक्रोड खाण्याची योग्य पद्धत कोणती? ते भिजवून खाल्ल्याने अधिक फायदे मिळतात की सुके अक्रोड खाणेही तितकेच फायदेशीर आहे? या दोन्ही पद्धतींमधील फरक समजून घेऊया.
अक्रोड आरोग्यासाठी का महत्त्वाचे आहेत?
अक्रोड हा पोषक घटकांनी समृद्ध असलेला सुकामेवा आहे. त्यामध्ये प्रथिने, तंतुमय पदार्थ, मॅग्नेशियम, झिंक आणि तांबे यांसारखी खनिजे असतात. याशिवाय अक्रोडामध्ये वनस्पतीजन्य ओमेगा-३ मेदाम्ले म्हणजेच अल्फा लिनोलेनिक आम्ल (ALA) आढळते.
ओमेगा-३ मेदाम्ले हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जातात. अक्रोडातील तंतुमय पदार्थ पचनसंस्थेच्या आरोग्याला मदत करतात. त्यातील प्रथिने शरीराच्या विविध कार्यांसाठी आवश्यक असतात, त्यामुळे संतुलित आहारात अक्रोडाचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
१. सुके अक्रोड खाण्याचे फायदे
अक्रोड खाण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे ते कोणत्याही तयारीशिवाय खाणे. सुके अक्रोड खाल्ल्याने त्यातील मूळ पोषक घटक मिळतात. त्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवण्याची किंवा सकाळी पाणी काढण्याची गरज नसते.
सुके अक्रोड कामाच्या ठिकाणी, प्रवासात किंवा सकाळच्या नाश्त्यासोबत सहज खाता येतात. त्यांचा साठाही तुलनेने सोपा असतो. मात्र, काही व्यक्तींना सुकामेवा चावण्यास किंवा पचवण्यास त्रास होऊ शकतो. अशा वेळी अक्रोडाचे छोटे तुकडे करून खाणे किंवा ते भिजवून पाहणे हा पर्याय असू शकतो.
२. भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे
अक्रोड रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजत ठेवल्यास ते मऊ होतात, त्यामुळे चावणे सोपे जाते. ज्यांना कडक अक्रोड चावण्यास त्रास होतो, त्यांच्यासाठी भिजवलेले अक्रोड सोयीचे ठरू शकतात.
काही लोकांचा असा समज आहे की अक्रोड भिजवल्याने त्यातील फायटिक आम्ल आणि टॅनिन्सचे प्रमाण कमी होते, त्यामुळे शरीराला खनिजे अधिक सहज शोषून घेता येतात. मात्र, अक्रोड भिजवल्याने पोषक घटकांचे शोषण निश्चितच वाढते असा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
भिजवलेले अक्रोड मऊ आणि किंचित मलईदार होतात, त्यामुळे त्यांची चव आणि पोत आवडणाऱ्या व्यक्ती ते खाण्यास प्राधान्य देतात. मात्र, पाण्यात भिजवल्यानंतर ते जास्त काळ साठवून ठेवू नयेत. स्वच्छ पाणी वापरून भिजवावेत आणि शक्यतो लवकर खावेत.
३. अक्रोड भिजवल्याने पोषणमूल्ये वाढतात का?
हा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे. अक्रोड भिजवल्याने त्यातील पोषक घटकांचे प्रमाण वाढते किंवा शरीराला ते अधिक प्रमाणात मिळतात, असा दावा अनेकदा केला जातो. मात्र, संशोधनातून याला ठोस पुष्टी मिळालेली नाही.
२०२० मध्ये ‘फूड केमिस्ट्री’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात अक्रोडासह बदाम, हेझलनट आणि शेंगदाणे भिजवण्याचा त्यांच्या पोषक घटकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी कच्चे आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी भिजवलेले सुकेमेवे तपासले.
या अभ्यासात भिजवल्यानंतर फायटिक आम्लाच्या प्रमाणात फारसा फरक आढळला नाही. उलट काही नमुन्यांमध्ये खनिजांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले, त्यामुळे सुकेमेवे भिजवल्याने खनिजांचे शोषण निश्चितच वाढते, या समजाला या संशोधनातून पुष्टी मिळाली नाही.
याचा अर्थ असा की, अक्रोड भिजवून खाल्ल्यानेच अधिक पोषण मिळते असे म्हणता येणार नाही. सुके आणि भिजवलेले अशा दोन्ही प्रकारे अक्रोड खाल्ले तरी त्यातील मूलभूत पोषक घटकांचा लाभ मिळू शकतो.
मग अक्रोड खाण्याची योग्य पद्धत कोणती?
अक्रोड भिजवून खावे की सुकेच, याचे एकच उत्तर नाही. तुम्हाला सुके अक्रोड चावण्यास आणि पचवण्यास त्रास होत नसेल तर ते तसेच खाऊ शकता. मात्र, मऊ पोत आवडत असेल किंवा चावण्यास सोपे जावे असे वाटत असेल तर अक्रोड भिजवून खाण्याचा पर्याय निवडू शकता.
अक्रोड भिजवताना स्वच्छ पाणी वापरा. भिजवलेले अक्रोड जास्त काळ बाहेर ठेवू नका. ते शक्यतो लवकर खा. तसेच अक्रोडाचा आहारात समावेश करताना प्रमाणाकडेही लक्ष द्या. कारण अक्रोडामध्ये आरोग्यदायी मेद असले तरी त्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते.
थोडक्यात सांगायचे तर अक्रोडाचे फायदे मिळवण्यासाठी ते भिजवणे अनिवार्य नाही. तुमची आवड, चावण्याची सोय आणि पचनाची क्षमता यानुसार सुके किंवा भिजवलेले अक्रोड खाऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात अक्रोड खाणे.
