उपवास म्हणजे अनेकदा एकादशी दुप्पट खाशी असेच असते. उपवासाच्या पदार्थांमध्येही कॅलरी वाढविणारे घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने उपवास काहीवेळा अनारोग्यदायी ठरु शकतो. उपवासाचा खरा अर्थ पोटाला आराम देणे हा असून तसे न होता उपवासाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच किंबहुना त्याहून जास्त खाण्याकडे कल असल्याचे दिसते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना तसेच सामान्यांनाही आरोग्याच्या समस्या भेडसावू शकतात. पण उपवास करायचा असल्यास तोही जास्तीत जास्त आरोग्यदायी होईल असा प्रयत्न करता येऊ शकतो. काय आहेत या टिप्स जाणून घेऊया…

१. उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे असल्याने या दिवशी आहारात हलक्या पदार्थांना समावेश करायला हवा. आपल्याकडे साधारणपणे साबुदाण्याची खिचडी खाण्याची पद्धत आहे. त्यात जास्त प्रमाणात कार्बोदके असतात त्यामुळे आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते. साबुदाणा मर्यादेत खाल्ल्यास त्रास होत नाही. पण ही मर्यादा लक्षात यायला हवी.

२. उपवासाच्या पदार्थांमध्ये दाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण दाण्यामध्येही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. तसेच पित्ताचा त्रास असेल तर दाण्याचा आणखी त्रास होऊ शकतो.

३. पूर्ण वेळ उपाशी राहून उपवास केल्याने पित्त वाढते. त्यामुळे असे शरीराला त्रास होईल अशापद्धतीने उपवास करणे टाळावे.

४. खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा हे पदार्थ उपवासाच्या दृष्टीने चांगले. त्यामुळे शरीरात त्राण टिकून राहतो आणि त्रास होण्याची शक्यताही कमी असते.

५. फलाहार हा कोणत्याही वयाच्या व्यक्तीसाठी उत्तम आहार आहे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश ठेवल्यास भूक भागते आणि शरीरातील ऊर्जाही टिकून राहण्यास मदत होते.

६. मधुमेही लोकांनी देखील उपाशी राहणे टाळावे. साबुदाणा, वरई हे कार्बोदके जास्त देणारे पदार्थ असल्याने मधुमेही लोकांनी याचा अती वापर टाळावा.

७. ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत यांसारख्या पेयांचा वापर केल्यास उपवासामुळे कमी होणारी ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.

८. वजन वाढीच्या दृष्टीकोनातून विचार केला तर चुकीच्या पद्धतीने केलेला उपवास हा वजन वाढवतो. आणि उपासाचे पदार्थ कधीतरी खायला मिळतात म्हणून जर जास्तच खाणे झाले तर पित्त, वजन वाढ होते. त्यामुळे ते टाळणे आवश्यक आहे.