Sonali Bendre Cancer Journey: अलीकडेच अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बाळंतपणानंतर आणि कॅन्सरच्या उपचारांनंतर शरीरात झालेल्या बदलांबद्दल मोकळेपणाने सांगितलं. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्याशी बोलताना सोनाली म्हणाली, “माझ्या उपचारांनंतर स्टेरॉइड्समुळे माझं वजन वाढलं होतं…”
तिचं हे वक्तव्य अनेक कॅन्सरमधून बरे झालेल्या लोकांच्या मनाला भिडलं, कारण उपचारांच्या काळात किंवा त्यानंतर अचानक वजन वाढण्याची समस्या अनेकांना जाणवते. पण खरंच स्टेरॉइड्समुळे अचानक वजन वाढतं का? सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मंदीप सिंग मल्होत्रा यांच्या मते, कॅन्सरच्या उपचारांदरम्यान आणि त्यानंतर स्टेरॉइड्समुळे वजन वाढणं ही खूप सामान्य गोष्ट आहे.
स्टेरॉइड्समुळे वजन कसं वाढतं?
“कॅन्सरच्या उपचारांमध्ये वापरले जाणारे स्टेरॉइड्स भूक वाढवतात आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण करतात,” असं डॉ. मल्होत्रा सांगतात.
डॉक्टर पुढे म्हणाले, “ही औषधं शरीराची ऊर्जा वापरण्याची प्रक्रिया बदलतात. त्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि पोट, चेहरा व मानेभोवती चरबी साठू लागते. फक्त चरबीच नाही तर स्टेरॉइड्समुळे शरीरात पाणीही साचू शकतं. अनेक वेळा स्टेरॉइड्समुळे वॉटर रिटेन्शन होतं, त्यामुळे वजन वाढलेलं अधिक दिसून येतं.”
महिलांवर होणारा मानसिक आणि शारीरिक परिणाम
“बाळंतपणातून सावरणं आणि त्याच वेळी कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या महिलांना खूप थकवा, हार्मोन्समध्ये बदल, अशक्तपणा आणि अंगदुखीचा सामना करावा लागतो,” असं डॉ. मल्होत्रा सांगतात.
शारीरिक त्रासाबरोबरच शरीरातील बदल मानसिकदृष्ट्याही कठीण ठरू शकतात. “वजन वाढणं, ब्लोटिंग, केस गळणं किंवा शरीरावरचे व्रण यामुळे आत्मविश्वासावर परिणाम होतो,” ते म्हणाले.
डॉ. मल्होत्रा यांच्या मते, अनेक रुग्णांना या काळात मानसिक ताण जाणवतो कारण बरे होण्याची प्रक्रिया अनिश्चित आणि कठीण वाटू शकते. “ताण, चिंता आणि निराशा या भावना खूप सामान्य आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
कॅन्सरमधून बरे झालेल्या लोकांनी लगेच वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा का?
डॉ. मल्होत्रा सांगतात की, उपचारानंतर लगेच कठोर डाएट किंवा झटपट वजन कमी करण्याच्या पद्धती टाळायला हव्यात.
“उपचारांनंतर शरीराला पुन्हा ताकद मिळवण्यासाठी आणि पूर्णपणे सावरण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे लगेच वजन कमी करण्याचा अति प्रयत्न करू नये,” ते म्हणाले.
“रुग्णाची तब्येत, उपचारांनंतरची अवस्था आणि शरीराची गरज लक्षात घेऊन डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वजन कमी करण्याचा प्लॅन करावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
स्टेरॉइड्समुळे वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं?
डॉ. मल्होत्रा यांच्या मते, उपचारांनंतर लगेच वजन कमी करण्यापेक्षा शरीर पूर्णपणे बरे होणं आणि दीर्घकाळ निरोगी राहणं अधिक महत्त्वाचं आहे.
“संतुलित आहार, योग्य प्रमाणात खाणं आणि चालणं किंवा योगासारखा हलका व्यायाम हा सर्वोत्तम मार्ग आहे,” ते म्हणाले.
ते प्रोटीनयुक्त पदार्थ, फळं, भाज्या आणि फायबरयुक्त अन्न खाण्याचा सल्ला देतात. “पुरेसं पाणी पिणं, चांगली झोप घेणं आणि ताण नियंत्रणात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ठेवणं. “झटपट उपायांपेक्षा हळूहळू आणि सातत्याने केलेले बदलच उपचारांनंतर अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरतात,” असा सल्ला डॉ. मल्होत्रा यांनी दिला.
