भारतातच नव्हे तर जगभरात हृदयाच्या विकाराचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. जेवणाच्या अनियमित वेळा, व्यायामाचा अभाव यामुळे अतिवजन व परिणामी कोलेस्ट्रॉलचा त्रास उद्भवतो. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या नसांवर ताण येतो व पुरेसे रक्त पोहोचत नाही. यातूनच हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी विकार, ट्रिपल वेसल असे अनेक आजार डोके वर काढतात. सुरुवातीला व्यायामाच्या अभावातून निर्माण झालेल्या या रोगांमुळे पुढे कायमस्वरूपी थकवा, चक्कर येणे, रक्तदाब असे त्रास जाणवू लागतात. एका वेळेनंतर काहीच करायची इच्छा होत नाही व सतत आळस वाटत राहतो. इथपर्यंत तरी ठीक आहे पण वेळीच लक्ष न दिल्यास हे त्रास जीवघेणे ठरू शकतात.

काही दिवसांपूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिम करताना हृदयविकराचा झटका आल्याचे उदाहरण समोर असताना आज, बिग बॉस फेम अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या दोन्ही घटनांनंतर आपल्या हृदयाकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज आपण काही अशा सवयी पाहणार आहोत ज्या अनेकदा आपल्या लक्षातही येत नाहीत पण त्यामुळे हृदयाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

सिगरेट आणि दारू

सिगरेट आणि दारूमुळे केवळ फुफ्फुसे आणि यकृतच नव्हे तर हृदयाचे सुद्धा मोठे नुकसान होते. उच्च रक्तदाब, हृदय अचानक बंद पडणे असे गंभीर आजार सुद्धा या सवयीमुळे उद्भवतात. आपण अनेकदा प्रत्यक्ष सिगरेटचे व्यसन करत नसाल तरी पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे इतर धूम्रपान करताना तिथे उपस्थित असल्याने सुद्धा तुम्हाला हे त्रास होऊ शकतात.

सोडायुक्त पेय

ऍसिडिटी व अपचन सारखे त्रास असणाऱ्यांना सोडायुक्त पेयांमुळे पटकन आराम मिळतो असे वाटते पण तुम्हाला रिफ्रेश करणारी ही पेयं हृदयाला घातक असतात.यातील कॅफीनचे प्रमाण हृदय ब्लॉकेज सारखे आजार तयार करते. यासाठीच कॉफी व चहा सुद्धा प्रमाणात घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

तेलकट जेवण

केवळ बाहेरील जंक फूडच नव्हे तर घरातही वारंवार तळलेले पदार्थ बनवून खात असाल तर आजच थांबवा. तेलकट पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक होते व त्यातून रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. तुम्ही तेलकट पदार्थांचे प्रमाण नियंत्रणात ठेवाच पण त्यासोबतच कच्चे तेल कधीही न खाण्याचा नियमच बनवून घ्या. (हे ही वाचा: Cooking Tips: कॉफी बीन्स शिवाय बनवा कॉफी पावडर; कॅफिनचं व्यसन हटवायचं तर ‘ही’ रेसिपी करा ट्राय)

प्रोसेस्ड फूड

अनेकजण चिकन- मटण सारखे मांस प्रोसेस्ड करून खाण्याचा पर्याय निवडतात. अर्थात प्रोटीनसाठी हे खाणे उत्तमच असा अनेकांचा समज असतो. मात्र प्रकिया केलेल्या अन्नातील पोषक तत्वे कमी होतात. उलट यातून उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

यापैकी कोणत्याही गोष्टींच्या सवयी आपल्यालाही असतील तर वेळीच त्यांच्यावर नियंत्रण ठेवा. एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवा. जर फार व्यायाम करणे शक्य नसेल तर निदान दिवसातून काही वेळ चालण्याची सवय लावा.