Sonchafa Khat Tips: सोनचाफा हे अनेकांच्या आवडीचं फुल आहे. त्याचा सुगंध जेव्हा दरवळतो तेव्हा प्रत्येकजण त्याच्या प्रेमातच पडत. अशा या सोनचाफ्याचं रोप आपल्याही बागेत असावं असं अनेकांना वाटतं. म्हणून जास्वंद गुलाब याबरोबर अनेकजण सोनचाफ्याचं रोप बागेत लावतात. पण फक्त रोप लावून त्याला वेळोवेळी पाणी देऊन सोनचाफ्याच्या कळ्या येत नाहीत. तर या रोपाला वेगवेगळ्या पद्धतीची खते देणे खूप आवश्यक असते, यासाठी बाजारातून महाग सेंद्रिय खत किंवा केमिकल्स आणायची गरज नाही. पण, किचनमधील काही वस्तू वापरूनही काम पूर्ण करता येतं.
सोनचाफ्याच्या झाडाची काळजी कशी घ्यायची (How to take care of Sonchafa Plant)
जेव्हा सोनचाफा आपण बागेत लावतो तेव्हा कुंडी ही थोड्या मोठ्या आकाराची म्हणजे कमीत कमी १५ ते १८ इंच एवढ्या आकाराची असायला हवी. कारण या कुंडीमध्ये जर झाड लावलं तर त्या झाडाच्या मुळाची वाढ चांगली होईल आणि झाड चांगले वाढेल आणि फुले भरपूर लागण्यासाठी मदत होईल.
सोनचाफा लावण्यापूर्वी मातीदेखील भुसभशीत चांगल्या प्रतीची तयार करावी त्यासाठी ४० टक्के साधी माती ३० टक्के मुरमाळ माती आणि ३० टक्के कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यात खेणखत, गांडूळखत यासारख्या खतांचा वापर करून त्यामध्ये थोडेशी हळद किंवा राख मिक्स करून माती तयार करून घ्यायची. या मातीत जर तुम्ही हे रोप लावले तर त्याची वाढ चांगली होते.
सोनचाफ्याचे झाड कुंडीमध्ये लावताना ते नेहमी कलम केलेलेच रोप लावावे कारण कलम केलेल्या रोपावर फुले लवकर आणि जास्त प्रमाणात लागत राहतात. जर तुम्ही बी पासून तयार केलेले रोप लावले असेल तर त्या रोपाला फुले लवकर लागत नाहीत. सोनचाफ्याच्या वाढीसाठी जसं खत देणं आवश्यक असतं तसंच या झाडाला सूर्यप्रकाश पाणी या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असतं. झाडाला पाणी कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा टिकून राहील इतपत पाणी देणे आवश्यक आहे. आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे कुंडीत पाणी साचू द्यायचे नाही, कारण त्यामुळे झाडांची मुळे सडतात खराब होतात आणि आपले रोप हळूहळू कमी होते.
खतासाठी करा ‘या’ दोन वस्तूंचा वापर (Sonchafa Fertilizer)
हिंग
हिंग झाडांसाठी अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर आहे. मात्र याचा वापर प्रमाणात करावा.हिंग बुरशीनाशक, किटकनाशक म्हणून खूप छान काम करतो. जर झाडाला कीड लागली तर झाडाची वाढ नीट होत नाही आणि त्यामुळे फुलंदेखील लागत नाहीत. त्यामुळे यासारख्या घरगुती किटकनाशकाचा वापर करूनदेखील तुम्ही झाडावरची कीड बुरशी घालवू शकता. हिंगाचा वापर तुम्ही दोन प्रकारे करू शकता. एक तर पाण्यामध्ये मिक्स करून किंवा असाच कोरड्या मातीमध्ये मिक्स केला तरीदेखील चांगला फायदा होतो.
कांद्याची साल
कांद्याच्या सालींचा कीटकनाशक म्हणून खूप चांगला फायदा होतो. कांद्याच्या सालीमध्ये पॉटेशियम, सल्फर, फॉस्फरस यासारखे घटक मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याचा उपयोग होतोच मात्र झाडांच्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या होऊन फुलांचा आकार मोठा होतो. फुलांचा रंगदेखील गडद होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. कांद्याच्या सालीतील सल्फरमुळे झाडांच्या मुळाची वाढ चांगली होते आणि त्यामुळे झाड चांगले वाढते.
VIDEO
किती प्रमाणात कराल खताचा वापर?
एका झाडासाठी हिंग एक चिमुटभर म्हणजे पाव चमचा एवढाच हिंगाचा वापर करायचा. एक मूठ भरून कांद्याच्या साली घ्यायच्या आणि त्या मातीमध्ये मिक्स करायच्या आणि वरून माती टाकायची. जेव्हा आपण पाणी देऊ तेव्हा सालीतील पोषक तत्त्वे मातीमध्ये मिक्स होतात आणि झाडाला फायदा होतो.
टीप- झाडाच्या कुंडीतील माती हलवून मोकळी करावी. यामुळे झाडे चांगली वाढतात. मातीमध्ये आफण जे खत पाणी देतो ते व्यवस्थित मिक्स होते. मातीमध्ये जर कोणते गवत उगवले असेल तर ते काढून टाकावे. कारण गवत मातीतील पोषक तत्त्वे शोषून घेण्याचं काम करतो.