आपल्या शरीरातून येणारे वेगवेगळे आवाज हे रोगनिदानासाठी उपयुक्त ठरू शकतात, भूकंपशास्त्राचा वापर जसा भूकंपाचा वेध घेण्यासाठी केला जातो तसेच शरीरातील आवाजांनी रोगांचा माग काढता येतो, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. इलॅस्टोग्राफी नावाचे शास्त्र असून ते मानवी शरीरातील रोगांचे निदान करू शकते. वैद्यकीय अल्ट्रासाउंड प्रतिमाचित्रण तंत्राचा वापर यात केला जातो. हे शास्त्र नव्याने उदयास येत आहे. जैविक उतींची लवचीकता पाहून यात कर्करोगाचे निदान करता येते, यकृत व थायरॉइड विकारांचा वेध घेता येतो. काही लहरींच्या मदतीने उतींची लवचीकता व ताणक्षमता तपासता येते. त्यामुळे शरीराचे सखोल प्रतिमाचित्रण शक्य असून त्याचा फायदा होतो. कारण त्यात शरीराला कुठे छेद द्यावा लागत नाही. फ्रान्समधील लॉयॉन विद्यापीठातील स्टीफन कॅथलिन यांनी सांगितले की, इलॅस्टोग्राफीने कर्करोगाचे निदान करता येते. जेव्हा वस्तूवर दाब वाढतो तेव्हा त्यातून काही लहरी निर्माण होतात. त्या भूकंपलहरीसारख्या स्फोटक असतात त्याना ‘शिअर वेव्हज’ म्हणतात. वैद्यकशास्त्रात स्पंदनशील उपकरणातून या लहरी तयार करून उती किंवा पेशीतील कडकपणा मोजला जातो. कर्करोगाच्या गाठी जास्त कडक उतींची शक्यता दाखवतात, आरोग्यवान उती कमी कठीणपणा दाखवतात. कुठल्याही प्रतिमाचित्रणात उती किंवा पेशीतील काठिण्य तपासता येत नाही ते यात शक्य आहे. यात एक स्पंदनशील यंत्रबाधित भागाला लावतात व ते दाबून शिअर वेव्हज निर्माण करून रोगनिदान केले जाते.