Cooking In Coconut Oil Health Effects: भारतीय स्वयंपाकघरात, विशेषतः दक्षिण भारतात खोबऱ्याच्या तेलाचा वापर पिढ्यानपिढ्या केला जात आहे. केवळ फोडणीसाठीच नव्हे, तर सौंदर्यप्रसाधने आणि औषधी गुणधर्मांसाठीही हे तेल वापरले जाते. अलीकडच्या काळात हे तेल ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते. या खोबऱ्याच्या तेलाच्या वापराबाबत प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना सुधा चंद्रन यांनी अलीकडेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. सुधा यांना दाक्षिणात्य पदार्थ इतके आवडतात की, त्यांचे पती रवी डांग (जे मूळचे पंजाबी आहेत) हे देखील आता या पदार्थांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात खोबरेल तेलाच्या वापरावरून त्यांना काही मजेशीर अनुभव आले होते.
‘पिंकव्हिला’ला दिलेल्या मुलाखतीत सुधा चंद्रन यांनी म्हटले की, “मी शुद्ध दाक्षिणात्य आहार घेते. मला अवियल आणि खोबरेल तेलात बनवलेले पदार्थ प्रचंड आवडतात. माझे पती पंजाबी असल्याने सुरुवातीला त्यांना खोबरेल तेल म्हणजे नक्की काय, हेच समजत नव्हते.”
त्यांनी लग्नानंतरच्या एका आठवणीला उजाळा दिला. सुधा जेव्हा पतीसोबत आपल्या गावी (त्रिशूर, केरळ) गेल्या होत्या, तेव्हा रवी डांग यांना तिथले ‘पुट्टू कडाला’ आणि ‘अप्पम’ खूप आवडले. पण एका प्रसंगाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “त्यांना पुरी-भाजी खायची इच्छा होती. दुर्दैवाने ती पुरी खोबरेल तेलात तळली गेली होती, जी चव त्यांना अजिबात सहन झाली नाही. तो एक भाग वगळता, आता त्यांना ओलन आणि अवियल सारखे केरळचे सर्व पदार्थ आवडतात.”
आरोग्यासाठी खोबरेल तेल किती फायदेशीर?
या विषयावर ठाणेमधील केआयएमएस (KIMS) हॉस्पिटलचे मुख्य आहारतज्ज्ञ अमरीन शेख यांनी तांत्रिक माहिती दिली. शेख यांनी खोबरेल तेलाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
ऊर्जेचा स्रोत: खोबरेल तेलात ‘मिडीयम चेन ट्रायग्लिसरायड्स’ (MCTs) असतात, जे शरीराला झटपट ऊर्जा देतात.
मर्यादित वापर आवश्यक: हे तेल ‘सॅच्युरेटेड फॅट’चा प्रकार असल्याने त्याचा वापर मर्यादित प्रमाणातच करावा.
संतुलित आहार: जर तुमच्या आहारात फायबर, पालेभाज्या आणि कडधान्यांचा समावेश असेल, तर पारंपरिक पदार्थांमध्ये थोडे खोबरेल तेल वापरणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे.
हृदयविकार आणि वजनावर परिणाम होतो का?
अमरीन शेख यांनी सांगितले की, “केवळ एका घटकामुळे वजन वाढत नाही, तर ते एकूण कॅलरीजवर अवलंबून असते. ज्यांना कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहे, त्यांनी तेल बदलून वापरणे (उदा. शेंगदाणा, तीळ किंवा मोहरीचे तेल) फायदेशीर ठरते. फक्त प्रमाणावर नियंत्रण ठेवणे, डाळी व दह्याद्वारे प्रथिनांचे प्रमाण वाढवणे, अधिक भाज्यांचा समावेश करणे आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी परंपरा सोडण्याची नाही, तर संतुलन राखण्याची गरज आहे.”
आपला पारंपरिक वारसा जपूनही फिट राहता येते. त्यासाठी जेवणाचे प्रमाण (Portion size) मर्यादित ठेवा, आहारात डाळी आणि दह्याचा समावेश करून प्रथिने वाढवा आणि तळलेले पदार्थ टाळा.
