Low Sperm Count In Men: सध्याची धावपळीची जीवनशैली आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत कोणीही अनभिज्ञ नाही. मात्र, जर तुम्हाला असं वाटत असेल की याचे परिणाम फक्त तेवढ्यापुरतेच होतात तर तसं अजिबात नाही. आपल्या काही लहान सहान सवयींचे परिणाम हे रोज आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत असतात. सोबतच पुरूष आणि महिला यांच्या लैंगिक आयुष्यावरही ते होतात.

आजकाल पुरूषांमध्ये स्पर्मची कमी संख्या ही समस्या खूप वेगाने दिसून येत आहे. खरं तर यामागे हीच बिघडलेली जीवनशैली आणि काही दैनंदिन आयुष्यात या सवयीच जबाबदार असू शकतात. अनेकदा कुटुंब नियोजन करताना पुरूषांना कलतच नाही की नेमकी समस्या कुठे आहे. मात्र त्याचे कारण त्यांच्या काही सवयी असू शकतात.

फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. सुनील जिंदल यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले की, आजकाल अनेक पुरूष रोजच्या आयुष्यात अशा काही चुका करतात ज्यांचा थेट परिणाम त्यांच्या स्पर्म काउंटवर म्हणजेच शुक्रांणूंच्या संख्येवर होतो. अनेक पुरूष दररोज काही अशा चुका करतात की त्यामुळे त्यांच्या शुक्राणूंचे नुकसान होऊ शकते. या सवयी इतक्या सामान्य आहेत की, त्यांचा प्रजनन क्षमतेशी देखील संबंध नाही मात्र त्या शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल करण्याची क्षमता आणि गुणवत्तेवर परिणाम करू शकतात. तर मग जाणून घ्या या कोणत्या सवयी आहेत…

१. जास्त उष्णतेच्या संपर्कात येणे

शुक्राणूंच्या उत्पादनासाठी शरीराच्या इतर भागापेक्षा कमी तापमान आवश्यक असते. अशा परिस्थितीत जर तो भाग बराच काळ वारंवार उष्णतेच्या संपर्कात राहिला तर शुक्राणूंचे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता या दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. आजकाल लोक सर्रास लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करताना दिसतात. लॅपटॉपमधून बाहेर पडणारी उष्णता शुक्राणूंचे नुकसान करू शकते.

२. दररोज धूम्रपान करणे

तज्ज्ञांच्या मते, धूम्रपान केल्याने शुक्राणूंच्या डीएनएला थेट नुकसान होऊ शकते. सिगारेटच्या धुरामध्ये असलेली रसायने ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवू शकतात. त्यामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत कुटुंब नियोजन करताना धूम्रपान सोडणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल ठरते.

३. पुरेशी झोप न घेणे

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुरेशी झोप न घेतल्याने शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. जेव्हा पुरेशी झोप होत नाही, तेव्हा त्याचा परिणाम हार्मोन्सवर होतो. यामुळे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होऊ शकते. ती शुक्राणूंच्या उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते. म्हणूनच बराच काळ व्यवस्थित झोप न घेणे हेदेखील शुक्राणूंच्या संस्खेवर परिणाम करू शकते.

४. अतिरिक्त चरबी आणि लठ्ठपणा

पुरूषाचे वजन जास्त असेल, तर त्याचाही परिणाम शुक्राणूंवर होऊ शकतो. डॉ. जिंदाल यांनी स्पष्ट केले की, जास्त चरबी टेस्टोस्टेरॉनला इस्ट्रोजेनमध्ये रूपांतरित करण्यास मदत करते. यामुळे पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असू शकते. ते शुक्राणू तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी खूप महत्त्वाचे आहे.

५. जास्त प्रमाणात मद्यपान

तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने पुरूषांच्या प्रजनन त्रमतेवर परिणाम होऊ शकतो. जेव्हा अल्कोहोलचे सेवन केले जाते, तेव्हा त्यातील काही घटक डीएनए खराब करण्याचे काम करतात. त्याच वेळी अल्कोहोलचे सेवन टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर देखील परिणाम करते, त्यामुळे शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.