Spinach not good for everyone: भारतीय आहारात पालेभाज्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या पारंपरिक आहारात मेथी, पालक, शेपू, चाकवत, माठ, अळू, राजगिरा, कोथिंबीर अशा विविध प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश केला जातो. पालेभाज्या केवळ जेवणाची चव आणि रंग वाढवत नाहीत, तर शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्त्वे पुरवण्याचे काम करतात. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फोलेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, तसेच फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे शरीराचे एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

आजच्या बदलत्या जीवनशैलीत अनेकांच्या आहारातून पालेभाज्यांचे प्रमाण कमी होताना दिसते. मात्र, नियमित आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचा समावेश केल्यास पचनसंस्था सक्षम ठेवण्यास, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण मिळवून देण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे प्रत्येक पालेभाजीमध्ये पोषक घटकांचे प्रमाण वेगवेगळे असते.

पालक खाण्याचे फायदे

पालक ही अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी पालेभाजी मानली जाते. पालकामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. विशेषतः व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई व फोलेट (व्हिटॅमिन बी9) यांचा पालकामध्ये समावेश असतो. त्याशिवाय पालकातून लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम व फायबरदेखील मिळते. पालकामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेसाठी उपयुक्त ठरते. व्हिटॅमिन के हाडांचे आरोग्य आणि रक्त गोठण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेसाठी महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्तीला मदत करते, तसेच वनस्पतीजन्य लोहाचे शरीरातील शोषण वाढवते. पालकामध्ये असणारे फोलेट पेशींची वाढ आणि नवीन पेशी तयार होण्यासाठी आवश्यक असते; तर त्यातील मॅग्नेशियम स्नायू आणि मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यासाठी महत्त्वाचे आहे. पालकामध्ये बीटा-कॅरोटीन, ल्युटीन व झिअॅक्सँथिन यांसारखी अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात. ही घटक शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे पालकाचा आहारात नियमित आणि योग्य प्रमाणात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

पालकाचे अतिसेवन केल्यास कोणते त्रास होऊ शकतात?

१. किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो

पालकामध्ये ऑक्झलेट नावाचा नैसर्गिक घटक मोठ्या प्रमाणात आढळतो. शरीरातील ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असल्यास ते कॅल्शियमसोबत एकत्र येऊन कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे तयार करण्यास हातभार लावू शकते. त्यामुळे ज्यांना यापूर्वी किडनी स्टोनचा त्रास झाला आहे किंवा ऑक्झलेट स्टोन तयार होण्याची प्रवृत्ती आहे, त्यांनी पालकाचे अतिसेवन टाळावे.

२. कॅल्शियमचे शोषण कमी होऊ शकते

पालकामध्ये कॅल्शियम असले तरी त्यातील ऑक्झलेटमुळे शरीराला हे कॅल्शियम पूर्णपणे शोषून घेता येत नाही. ऑक्झलेट कॅल्शियमशी जोडले जाऊन, त्याचे शोषण कमी करू शकते. त्यामुळे केवळ पालक खाल्ल्याने शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण होते, असे समजू नये.

३. पोटाचे विकार आणि गॅसचा त्रास

पालकामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबर पचनसंस्थेसाठी फायदेशीर असले तरी अचानक मोठ्या प्रमाणात पालक खाल्ल्यास काही लोकांना पोट फुगणे, गॅस, पोटात कळ येणे किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल जाणवू शकतात. विशेषतः ज्यांची पचनशक्ती संवेदनशील आहे, त्यांनी पालकाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

४. रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास काळजी घ्या

पालकामध्ये व्हिटॅमिन के मोठ्या प्रमाणात असते. हे जीवनसत्त्व रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. जे लोक वॉरफरिन यांसारखी रक्त पातळ करणारी औषधे घेतात, त्यांच्या औषधांच्या परिणामावर व्हिटॅमिन केच्या सेवनातील अचानक बदलांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी पालकाचे सेवन अचानक वाढवू किंवा कमी करू नये. आहारातील प्रमाण सातत्याने ठेवावे.

५. किडनीच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी

पालकामध्ये पोटॅशियमचे प्रमाणही चांगले असते. सक्षम किडनी शरीरातील अतिरिक्त पोटॅशियम बाहेर टाकण्यास मदत करते. मात्र, किडनीचे कार्य कमी झालेल्या व्यक्तींमध्ये पोटॅशियम शरीरात साचण्याची शक्यता असते. रक्तातील पोटॅशियम वाढल्यास हृदयाच्या ठोक्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पालकाचे प्रमाण ठरवावे.

६. पालक व्यवस्थित न धुतल्यास संसर्गाचा धोका

पालकाची पाने जमिनीजवळ वाढत असल्याने त्यावर माती, जंतू आणि कीटकनाशकांचे अवशेष असू शकतात. पालक व्यवस्थित न धुता किंवा अस्वच्छ पद्धतीने शिजवून खाल्ल्यास पोटाचे संसर्गजन्य विकार होऊ शकतात. त्यामुळे पालकाची पाने स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुऊनच वापरावीत.

७. कच्च्या पालकाचा ज्यूस अति प्रमाणात पिणे टाळा

अनेक जण आरोग्यासाठी पालकाचा ज्यूस किंवा स्मूदी नियमित पितात. मात्र, मोठ्या प्रमाणात कच्चा पालक एकाच वेळी सेवन केल्यास शरीरात ऑक्झलेटचे प्रमाण जास्त जाऊ शकते. त्यामुळे विशेषतः किडनी स्टोनचा पूर्वी त्रास झालेल्या व्यक्तींनी कच्च्या पालकाचा ज्यूस रोज मोठ्या प्रमाणात पिणे टाळावे.

पालक किती प्रमाणात खावा?

  • तंदुरुस्त व्यक्तींनी संतुलित आहाराचा भाग म्हणून पालकाची भाजी योग्य प्रमाणात खावी.
  • रोज मोठ्या प्रमाणात पालक खाण्याऐवजी मेथी, शेपू, माठ, चाकवत यांसारख्या इतर पालेभाज्यांचाही आहारात समावेश करावा.
  • पालक शिजवून खाल्ल्याने त्यातील काही प्रमाणातील विरघळणारे ऑक्झलेट कमी होऊ शकते.
  • किडनी स्टोन किंवा किडनीच्या आजाराचा त्रास असणाऱ्यांनी वैयक्तिक आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.