Stomach Cancer Early Symptoms: कर्करोगाचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांमध्ये कर्करोग होऊ शकतो. त्यापैकीच एक म्हणजे पोटाचा कॅन्सर. या आजाराची सुरुवातीची काही लक्षणं साध्या पचनाच्या त्रासासारखी वाटू शकतात. त्यामुळे अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होतं. मात्र अशी लक्षणं वारंवार होत असतील किंवा काही आठवडे कमी होत नसतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. विनय गायकवाड यांच्या माहितीनुसार, पोटाशी संबंधित काही लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. विशेषतः एखादी समस्या वारंवार होत असेल, वाढत असेल किंवा त्यासोबत वजन कमी होणे, भूक मंदावणे किंवा सतत अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
१. वारंवार अपचन, अॅसिडिटी किंवा पोट फुगणं
वारंवार अपचन होणं, छातीत जळजळ, ढेकर येणं किंवा जेवल्यानंतर पोट खूप भरल्यासारखं वाटणं ही लक्षणं अनेकदा साध्या पचनाच्या समस्यांशी संबंधित असतात. मात्र हा त्रास वारंवार होत असेल आणि नेहमीच्या उपायांनी कमी होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पोटाचा कॅन्सर असताना अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात.
२. थोडं खाल्लं तरी लगेच पोट भरल्यासारखं वाटणं
पूर्वीपेक्षा कमी अन्न खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटत असेल किंवा जेवणाची इच्छा कमी झाली असेल, तर त्यामागचं कारण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. लवकर पोट भरणं हे पोटाच्या कॅन्सरमध्ये दिसू शकणारं लक्षण आहे.
३. सतत मळमळ किंवा उलटी होणं
कधीतरी मळमळणं किंवा उलटी होणं सामान्य असू शकतं. मात्र हा त्रास वारंवार होत असेल, विशेषतः जेवल्यानंतर सतत मळमळ किंवा उलटी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पोटाच्या कॅन्सरमध्ये मळमळ आणि उलटीसारखी लक्षणं दिसू शकतात.
४. कारण नसताना वजन कमी होणं
डाएट किंवा व्यायामात कोणताही बदल केलेला नसताना वजन झपाट्यानं कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण- नसताना वजन कमी होणं हे पोटाच्या कॅन्सरसह अनेक आजारांमध्ये दिसू शकतं. त्यामुळे अशा बदलाचं कारण डॉक्टरांकडून तपासून घेणं आवश्यक आहे.
५. सतत थकवा किंवा रक्तस्रावाची लक्षणं
सतत थकवा, अशक्तपणा किंवा शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटणं यामागे अनेक कारणं असू शकतात. काही वेळा पोटातून रक्तस्राव झाल्यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते आणि त्यामुळे थकवा जाणवू शकतो. उलटीत रक्त दिसणं किंवा शौचाचा रंग नेहमीपेक्षा काळा होणं ही गंभीर लक्षणं आहेत. अशा वेळी वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे.
लक्षणं दिसली म्हणजे कॅन्सरच असतो का?
नाही. ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अपचन, पोट फुगणं, मळमळ, उलटी, थकवा किंवा वजन कमी होणं यांसारखी लक्षणं इतर अनेक कारणांमुळेही होऊ शकतात. मात्र ती सतत राहिली, वाढत गेली किंवा नेहमीपेक्षा वेगळी वाटली, तर स्वतःहून कारण ठरवण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. NHS च्या माहितीनुसार पचनाशी संबंधित त्रास तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
पोटाच्या कॅन्सरचं निदान करण्यासाठी डॉक्टर गरजेनुसार रक्त तपासणी, शौचातील लपलेलं रक्त तपासणं आणि पुढील तपासण्यांचा सल्ला देऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये एंडोस्कोपी आणि बायोप्सीद्वारे निदान केलं जातं.
म्हणूनच, रोजच्या आयुष्यातील साधा वाटणारा पचनाचा त्रास सतत होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. घाबरून जाण्याची गरज नाही; पण शरीरात वारंवार होणारे बदल वेळीच तपासून घेणं नक्कीच महत्त्वाचं आहे.
