Stomach Cancer Symptoms: पोटाच्या कर्करोगाला ‘गॅस्ट्रिक कॅन्सर’, असेही म्हटले जाते. याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य आजारांसारखीच असल्याने त्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, जेव्हा या कर्करोगाचे निदान होते, तोपर्यंत गाठ बऱ्याच प्रमाणात वाढलेली असते. त्यामुळे पोटाच्या कर्करोगाचे लवकर निदान होणे आणि त्यावर त्वरित उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोटाच्या कर्करोगाच्या बाबतीत दिसून येणारी पहिली पाच लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
पोटाच्या कर्करोगाची ५ लक्षणे : 5 Early Symptoms Of Stomach Cancer
पोट दुखणे
पोटाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर अनेकदा पोटदुखी जाणवते. ही वेदना बऱ्याचदा पोट बिघडल्यासारखी वाटते आणि त्यामुळे लोक त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र, जर तुमच्या पोटाचा भाग जाड होऊ लागला आणि पोटदुखी जाणवली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
छातीत जळजळ आणि अपचन
सतत होणारा छातीत जळजळण्याचा त्रास आणि अपचन या किरकोळ समस्या नाहीत. जर तुम्हाला वारंवार अशी लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
भूक मंदावणे
पोटाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भूक मंदावण्याची समस्या उद्भवू शकते. अशा वेळी संबंधित व्यक्तीला पोटात जडपणा जाणवू शकतो आणि अनेकदा काहीही खाण्याची इच्छा होत नाही.
काळ्या रंगाची विष्ठा
पोटाच्या कर्करोगाची लक्षणे विष्ठेमध्येही दिसून येऊ शकतात. संबंधित व्यक्तीला काळ्या रंगाची विष्ठा होऊ शकते, जे शरीराच्या आत रक्तस्राव होत असल्याचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला काळ्या रंगाची विष्ठा किंवा इतर कोणतीही असामान्य लक्षणे आढळली, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका
थकवा जाणवणे
कर्करोग उद्भवतो तेव्हा शरीरातील पेशींवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे सतत थकवा जाणवतो. याव्यतिरिक्त अशक्तपणा आणि कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वजन कमी होणे, अशी लक्षणेही दिसून येऊ शकतात.
पोटाच्या कर्करोगाचे निदान कसे केले जाते?
पोटाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासणी आणि इमेजिंग चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये एंडोस्कोपी केली जाऊ शकते. या प्रक्रियेत पोटाच्या आतील अस्तराची तपासणी करण्यासाठी एका लवचिक नळीद्वारे पोटात कॅमेरा सोडला जातो. बायोप्सी केली जाते, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींची उपस्थिती निश्चित करण्यासाठी एंडोस्कोपीदरम्यान गोळा केलेल्या उतींचे (tissues) नमुने तपासले जातात. सीटी (CT), एमआरआय (MRI) किंवा पेट (PET) स्कॅनसारख्या इमेजिंग चाचण्याही केल्या जाऊ शकतात.
पोटाच्या कर्करोगावरील उपचार
पोटाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, ज्यामध्ये कर्करोगग्रस्त भाग काढून टाकला जातो. कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी दिली जाऊ शकते. त्याव्यतिरिक्त विशिष्ट प्रकारच्या पोटाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी ‘टार्गेटेड थेरपी’ आणि ‘इम्युनोथेरपी’चा वापर केला जातो.
