Pulses to Avoid at Night: आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल, ताणतणाव, दिवसभराचे तळलेले-अतिभारी खाद्य… या सगळ्यांचा परिणाम थेट आपल्या पचनसंस्थेवर होतो. पचन बिघडले की वायू, आम्लपित्त, वरवरची जळजळ, पोटफुगी अशा अनेक तक्रारी आपल्याला त्रास देऊ लागतात. विशेषत: संध्याकाळपासून रात्रीपर्यंत शरीराची पचनक्षमता मंदावत जाते, त्यामुळे रात्री जे काही खातो त्याचा परिणाम अधिक तीव्र दिसतो.

शरीराला प्रथिने, लोहतत्व, तंतुमय घटक आणि खनिजे मिळवून देणाऱ्या डाळी आपल्या थाळीचा अविभाज्य भाग आहेत. पण, काही विशिष्ट डाळी अशा असतात की ज्या रात्री खाल्ल्या तर पोटात प्रचंड वायू तयार होऊन पोट लगेचच फुगू लागतं. पण कारण कळत नाही. दिवसा खाल्लेली डाळ व्यवस्थित पचते, पण रात्री खाल्ली की त्रास वाढतो. काहींच्या बाबतीत तर डाळ खाल्ली की लगेच आम्लता, उलट वायू, पोटदुखी सुरू होते; अशामुळे कोणत्या तीन डाळी वायूसाठी सर्वाधिक जबाबदार आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. चला पाहूया त्या तीन डाळी, त्यांचा पचनावर होणारा परिणाम आणि त्यांचा योग्य वापर केल्यास त्रास कसा टाळता येईल…

‘या’ ३ डाळींमुळे होऊ शकतो गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास

१) पांढरी मटकी (सफेद मटार)

कुलच्यांसोबत जी ‘चणे’ समजून खाल्ली जाते, ती प्रत्यक्षात पांढरी मटकी! प्रथिने आणि तंतुमय घटकांनी समृद्ध असली तरी ही डाळ अतिशय जड आणि हळू पचणारी आहे. पोटात जाऊन तिचे विघटन वेळ घेते आणि त्यातून वायूचा त्रास वाढतो.

Award Banner

२) उडीद डाळ- शरीराला जड, पोटाला धोकादायक

उडीद डाळ ही सर्वांत जड आणि वायूकारक डाळ मानली जाते. कमजोर पचन असणाऱ्यांनी तर ही डाळ पूर्णपणे टाळावी, कारण तिच्यातील घटक पोटात जाऊन लगेच वायू तयार करतात आणि पचनसंस्था थकवतात. काहींना सांध्यांमध्ये वेदना वाढण्याची तक्रारही जाणवते.

३) हरभरा डाळ- पौष्टिक पण वायूकारक

हरभऱ्याची डाळ पौष्टिक असली तरी पोटात वायू निर्माण करण्याची क्षमता जास्त असते. रात्री खाल्ली तर जडपणा, पोटफुगी आणि आम्लता वाढण्याची शक्यता दाट.

डाळ आपल्यासाठी उत्तम पोषणाचा स्रोत आहे; मात्र ती केव्हा आणि कशी खाल्ली जाते यावर पचनाचा परिणाम ठरतो. दिवसा पचनक्रिया चांगली असल्याने त्रास कमी होतो, पण रात्रीच्या जेवणात या तीन डाळी टाळल्या तर वायू, पोटफुगी होण्यापासून मोठ्या प्रमाणात बचाव करता येतो.

डाळी योग्य प्रकारे भिजवून, हिंग-मेथी-बडीशेप यांचा वापर करून शिजवल्या तर त्या हलक्या, पचायला सुलभ आणि आरोग्यस्नेही बनतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)