Stomach Pain Gastritis Symptoms Causes & Treatment : उन्हाळ्याबरोबर विविध आजारांचा धोकाही वाढतो. यात पोटाशी संबंधित आजारांचा त्रास वाढू लागतो. भूक कमी होते, सतत थंड पाणी किंवा थंड पदार्थ खावेसे वाटतात. उन्हाळ्यात मसालेदार आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने काहींना पोट आणि छातीत जळजळ जाणवू लागते. पण, यामागचे मुख्य कारण केवळ आहार नाही तर वाढलेलं आम्ल आणि पित्त विकारदेखील आहेत.
आयुर्वेदानुसार, छाती किंवा पोटात होणारी जळजळ हे शरीरात पित्त आणि आम्लाचे प्रमाण वाढल्याचे सूचित करते. जेव्हा शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते तेव्हा छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, डोके जड होणे किंवा डोळ्यांत जळजळ होणे अशी विविध लक्षणे दिसू शकतात. अशावेळी काही थंड आणि पित्त शांत करणारे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते; जसे की शतावरी, शंख राख आणि ज्येष्ठमध याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील अग्नि (अग्नी) शांत करण्यास आणि पित्त संतुलित करण्यास मदत होते.
उन्हाळ्यात शरीरात पित्ताचे प्रमाण का वाढते?
शरीरात आम्ल किंवा पित्त वाढण्यामागे अनेक कारणं आहेत, जसे की रात्री उशिरा खाणे, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणे, जास्त चहा आणि कॉफी घेणे, जास्त ताणतणाव आणि जास्त वेळ उपाशी राहणे यामुळेदेखील पोटात आम्ल वाढू शकते. यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही शतावरी आणि शंखाची राख खाऊ शकता. दोन्हीचे समान प्रमाणात सेवन केल्याने पोट थंड होते आणि आम्लाचे प्रमाण कमी होते.
पोटाची जळजळ कशी शांत करावी?
याव्यतिरिक्त तुम्ही ज्येष्ठमध आणि साखरेचे सेवन केल्याने पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. कोमट दूध किंवा पाण्याबरोबर या दोघांचे मिश्रण घ्या, यामुळे पोटातील उष्णता कमी होते आणि छाती आणि पोटातील जळजळ कमी होते.
आता पोटातील आम्लतेचे परिणाम कमी करण्यासाठी आणि पित्त संतुलित करण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया. यासाठी तुम्ही सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करा. जेवणानंतर लगेच बसण्याऐवजी थोडं फिरून या, यामुळे अन्न चांगले पचण्यास मदत होईल आणि गॅस आणि ढेकर येणे कमी होईल. उन्हाळ्यात पोटात थंडावा निर्माण करतील असे हलके पदार्थ खा.
