Stress Relief Dr Shriram Nene’s 7 Effective Tips: आजची धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता ताण, सततची धावपळ व वैयक्तिक जबाबदाऱ्या यांमुळे तणाव हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. काही वेळा थोडा ताण जाणवणे स्वाभाविक असले तरी तो सतत राहिल्यास त्याचा परिणाम मनासोबतच शरीरावरही होऊ शकतो. त्यामुळे वेळेत तणावाचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते.

तणाव वाढला की, मन अस्वस्थ होणे, चिडचिड होणे, एकाग्रता कमी होणे किंवा सतत चिंता वाटणे अशा समस्या जाणवू शकतात. दीर्घकाळ तणाव राहिल्यास आधीपासून असलेल्या काही आरोग्यविषयक समस्यांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अशा वेळी स्वतःला सावरण्यासाठी नेमके काय करता येईल?

अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि हृदय व छातीच्या शस्त्रक्रियेचे तज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सात सोपे उपाय सांगितले आहेत. हे उपाय दैनंदिन जीवनात नियमितपणे अंगीकारण्याचा प्रयत्न केल्यास तणावाशी सामना करण्यास मदत होऊ शकते.

१. पुरेशी आणि शांत झोप घ्या

तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. प्रौढ व्यक्तींनी साधारण सात ते नऊ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे डॉ. नेने सांगतात. मुलांना त्यापेक्षा अधिक झोपेची गरज असू शकते.

झोप पूर्ण झाली नाही, तर दिवसभर थकवा जाणवू शकतो आणि तणाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीची झोप कमी करण्यापेक्षा नियमित आणि पुरेशी झोप घेण्याला प्राधान्य द्या.

२. दररोज व्यायाम करा

शारीरिक हालचाल केवळ शरीरासाठीच नाही, तर मनासाठीही उपयुक्त ठरते. दररोज साधारण ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, व्यायामामुळे शरीरात एंडॉर्फिन आणि डोपामिनसारख्या रसायनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे मनःस्थिती सुधारण्यास आणि एकाग्रता राखण्यास मदत होऊ शकते.

३. आपली माणसं जवळ ठेवा

तणावाच्या काळात स्वतःला सर्वांपासून दूर ठेवण्यापेक्षा विश्वासू व्यक्तींशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. कुटुंबीय, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींशी नियमित बोलल्याने मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळते.

डॉ. नेने सामाजिक आधाराचे जाळे तयार करण्याचा सल्ला देतात. चांगला सामाजिक संवाद कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास आणि आयुष्यात पुढे जाण्यास मदत करू शकतो.

४. कामांना प्राधान्यक्रम द्या

दिवसभरातील प्रत्येक काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास ताण आणखी वाढू शकतो. त्यामुळे कोणते काम आधी करायचे आणि कोणते नंतर करता येईल, हे ठरवा.

लहान आणि शक्य असलेली कामे आधी पूर्ण केल्याने कामाचा भार कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते.

५. सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या

दिवसभरात काय मिळाले यापेक्षा काय राहून गेले याचा विचार करीत राहिल्यास मनावरचा ताण वाढू शकतो. त्यामुळे दिवसभरात साध्य झालेल्या छोट्या छोट्या गोष्टींचीही दखल घ्या.

डॉ. नेने सांगतात की, आपण जे साध्य केले आहे, त्याकडे सकारात्मकतेने पाहणे महत्त्वाचे आहे. जे एखाद्या दिवशी पूर्ण करता आले नाही, त्याचाच सतत विचार करण्यापेक्षा पुढच्या दिवसासाठी नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करा.

६. श्वासावर लक्ष केंद्रित करा

तणावाच्या क्षणी काही वेळ शांत बसून श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणे उपयोगी ठरू शकते. डॉ. नेने यांनी पाच सेकंद हळूहळू दीर्घ श्वास घेणे, तो सुमारे पाच सेकंद रोखून ठेवणे आणि त्यानंतर श्वास सोडण्याचा सराव सांगितला आहे.

यासोबतच ध्यान आणि सजग श्वसनाचा सराव केल्याने मन शांत करण्यास, एकाग्रता सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

७. गरज वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्या

तणाव सतत जाणवत असेल आणि तो स्वतःच्या प्रयत्नांनी नियंत्रित करणे कठीण होत असेल, तर तज्ज्ञांची मदत घेण्यास अजिबात संकोच करू नका. मानसिक आरोग्य तज्ज्ञ परिस्थिती समजून घेऊन योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक उपचार सुचवू शकतात.

डॉ. श्रीराम नेने यांच्या मते, तणावातून बाहेर पडण्यासाठी या उपायांचा नियमित सराव करणे महत्त्वाचे आहे. मात्र, तणावामुळे दैनंदिन जीवन, काम, झोप किंवा नातेसंबंधांवर मोठा परिणाम होत असेल, तर केवळ स्वतःहून उपाय करण्याऐवजी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक योग्य ठरते.

तणाव पूर्णपणे टाळणे प्रत्येक वेळी शक्य नसते; मात्र त्याला कसे सामोरे जायचे, हे शिकता येते. पुरेशी झोप, नियमित व्यायाम, जवळच्या व्यक्तींशी संवाद, कामांचे योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन, श्वसनाचा सराव व गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत- या सात गोष्टी दैनंदिन जीवनाचा भाग करण्याचा प्रयत्न केल्यास तणावाचे व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते.