Brain Stroke Early signs: जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो, ही एक जीवघेणी स्थिती आहे, ज्यावर वेळीच उपचार केले नाही तर मृत्यूही होऊ शकतो. पण, तुम्हाला ब्रेन स्ट्रोकबाबत माहीत आहे का? याची लक्षणं हलकी असतात, जे आधीच ओळखून मोठा अटॅक टाळता येऊ शकतो. स्ट्रोक (पक्षाघात) ही आरोग्याशी संबंधित एक गंभीर समस्या आहे, जी मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यामुळे उद्भवते. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो किंवा काही मिनिटांतच त्यांना अर्धांगवायूचा (पॅरालिसिस) झटका बसू शकतो, म्हणूनच स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणीची स्थिती मानली जाते, ज्यासाठी त्वरित उपचारांची आवश्यकता असते. जरी काही स्ट्रोक अचानक येत असले, तरी बहुतेक प्रकरणांमध्ये शरीर काही आठवडे किंवा अगदी काही महिने आधीपासूनच धोक्याची महत्त्वपूर्ण लक्षणे दर्शवू लागते.

बेंगळुरू येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील एमडी (जनरल फिजिशियन) डॉ. रवी केसरी स्पष्ट करतात की, सीव्हीए (CVA) म्हणजेच ‘स्ट्रोक’ (पक्षाघात) ही अशी स्थिती आहे, ज्यासाठी त्वरित वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. जर सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखली आणि आवश्यक उपचार दिले तर स्ट्रोकची तीव्रता कमी करण्यास तसेच अर्धांगवायू आणि मृत्यू टाळण्यास मदत होऊ शकते. चला तर मग, स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात यावर आपण नजर टाकूया.

सतत होणारी आणि असामान्य डोकेदुखी

काही लोकांना स्ट्रोक येण्यापूर्वीच्या महिनाभरात अशा प्रकारची डोकेदुखी जाणवते, जी त्यांच्या नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. ही डोकेदुखी अचानक सुरू होते, अधिक तीव्र असते आणि बराच काळ टिकते. या वेदनेसोबतच अनेकदा चक्कर येणे, मळमळणे आणि दृष्टी अंधुक होणे अशी लक्षणेही दिसून येतात. मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यातील बदलांमुळे किंवा अंतर्गत रक्तस्राव सुरू झाल्यामुळे असे होऊ शकते.

शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा किंवा बधिरता

जर तुम्हाला अचानक चेहऱ्यावर, हातावर किंवा पायावर विशेषतः शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा, बधिरता किंवा मुंग्या आल्यासारखे वाटत असेल तर हे स्ट्रोकचे एक प्रमुख धोक्याचे लक्षण आहे. ही लक्षणे काही मिनिटांसाठी दिसू शकतात आणि नंतर नाहीशी होऊ शकतात. परंतु, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू नये; ही लक्षणे सूचित करतात की मेंदूच्या त्या भागाला होणारा रक्तपुरवठा कमी होत आहे.

बोलण्यात अडचण

स्ट्रोकच्या सुरुवातीच्या टप्प्यात संबंधित व्यक्तीची बोलण्याची पद्धत अचानक अडखळणारी किंवा अस्पष्ट होऊ शकते. शब्द स्पष्टपणे उच्चारता न येणे, वाक्ये समजण्यात अडचण येणे किंवा योग्य शब्द न सुचणे ही सर्व लक्षणे मेंदूच्या ज्या भागाद्वारे भाषेवर नियंत्रण ठेवले जाते, त्यावर परिणाम होत असल्याचे दर्शवतात. अशा परिस्थितीकडे त्वरित वैद्यकीय आणीबाणी म्हणून पाहिले पाहिजे.

दृष्टीशी संबंधित अचानक उद्भवणाऱ्या समस्या

स्ट्रोक येण्यापूर्वी अनेक व्यक्तींना अचानक अंधूक दिसणे, वस्तू दोन दिसणे, एका डोळ्याची दृष्टी कमी होणे, डोळ्यांसमोर ठिणग्या दिसणे किंवा कशावरही लक्ष केंद्रित करता न येणे अशा समस्या जाणवतात. मेंदूचा जो भाग दृष्टीवर नियंत्रण ठेवतो, त्यावर परिणाम झाल्यामुळे ही लक्षणे दिसून येतात.

चक्कर येणे आणि तोल जाणे

मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे वारंवार चक्कर येणे, तोल जाऊन चालणे आणि तोल जाणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. जर ही लक्षणे अनेक दिवस किंवा आठवडे टिकून राहिली किंवा कालांतराने अधिक गंभीर झाली तर ते येऊ घातलेल्या पक्षाघाताचे (स्ट्रोकचे) लक्षण असू शकते.