Acharya Balkrishna Hair Tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत एक समस्या झपाट्याने वाढताना दिसते आहे ती म्हणजे केसगळती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या त्रासाने हैराण झाले आहेत. आरशात रोज वाढत जाणारी विरळ केसांची रेषा आणि उशीवर पडलेले केस पाहून मनात भीती निर्माण होते. “हे असंच चालू राहिलं, तर पुढे काय?” असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. अशाच वेळी योगगुरू व आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी केसगळतीमागील कारणे आणि त्यावरील प्रभावी उपाय स्पष्ट केले आहेत.
आचार्य बालकृष्ण यांच्या मते, आज केसगळतीचे प्रमाण वाढण्यामागे अनेक कारणे जबाबदार आहेत. बदललेला आहार, प्रदूषित वातावरण आणि सततचा ताण यांचा थेट परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो. धक्कादायक बाब म्हणजे आता लहान मुलांनाही केसगळतीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामागे बाजारात सहज मिळणाऱ्या रासायनिक घटकांनी भरलेल्या केसांच्या उत्पादनांचा अतिरेकी वापर मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचे ते सांगतात.
केसगळतीची नेमकी कारणे कोणती?
केस धुण्यासाठी वापरले जाणारे अनेक तयार शॅम्पू केसांच्या मुळांवर घातक परिणाम करतात. शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता, विशेषतः आवश्यक पोषक घटकांचा अभाव असल्यास केस कमजोर होतात. काही वेळा आनुवंशिक कारणांमुळेही टक्कलपणाची समस्या उदभवू शकते. त्याशिवाय एखादा दीर्घकालीन आजार किंवा औषधांचा परिणामदेखील केसगळतीस कारणीभूत ठरतो.
घरच्या घरी करा केसांची काळजी
आचार्य बालकृष्ण यांनी केसगळती थांबवण्यासाठी काही सोपे, पण परिणामकारक आयुर्वेदीय उपाय सुचवले आहेत. सर्वप्रथम रासायनिक पदार्थांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्याऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास केसांचे आरोग्य सुधारू शकते.
आवळा हा केसांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. आवळा थेट खाल्ल्यास किंवा त्याचा रस सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. आवळा आणि कोरफड यांचा रस एकत्र करून घेतल्यास केसांच्या मुळांना बळकटी मिळते.
एक प्रभावी उपाय म्हणजे लोखंडी कढईत आवळ्याचा रस, रीठा व शिकेकाई पाण्यात मिसळून उकळणे. हे पाणी थंड झाल्यावर आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे केस स्वच्छ होतात आणि मुळे मजबूत होण्यास मदत होते. त्याशिवाय घरी तयार केलेले ताक केस धुण्यासाठी वापरल्यास केसांना नैसर्गिक चमक येते.
आवळा केसांसाठी का ठरतो अमृतासमान?
आवळा हा जीवनसत्त्व ‘क’चा समृद्ध स्रोत आहे. त्याच्या सेवनाने किंवा त्याचा रस लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते. आवळ्यातील अमिनो आम्ले केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत करतात. रक्ताभिसरण सुधारल्याने केसांची वाढ चांगली होते आणि केस मऊ, मजबूत व दाट होतात.
केसगळतीचा त्रास कमी करण्यासाठी महागडी उत्पादने नव्हे, तर योग्य सवयी आणि आयुर्वेदीय उपायांची गरज आहे. वेळेवर काळजी घेतली, तर केस पुन्हा आरोग्यदायी आणि मजबूत होऊ शकतात हेच आचार्य बालकृष्ण यांचे ठाम मत आहे.

