Foods to Reduce Blood Sugar Naturally: उन्हाळा सुरू झाला की अनेकांना थकवा, घाम आणि शरीरातील पाण्याची कमतरता यांचा त्रास जाणवू लागतो. पण ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही परिस्थिती आणखी आव्हानात्मक ठरू शकते; कारण शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाले की रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची शक्यता निर्माण होते, त्यामुळे या काळात आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
तज्ज्ञांच्या मते मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रोजच्या आहारात भाज्यांचा समावेश नक्कीच करायला हवा. ताज्या, वाफवलेल्या किंवा हलक्या भाजलेल्या भाज्या शरीराला आवश्यक पोषण देतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होऊ शकते. काही आहारतज्ज्ञ असेही सांगतात की, जेवणाच्या ताटातील किमान अर्धा भाग हा बिनस्टार्चच्या भाज्यांनी भरलेला असावा.
भुवनेश्वर येथील एका नामांकित रुग्णालयातील वरिष्ठ आहारतज्ज्ञ गुरु प्रसाद दास यांच्या मते, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्वे आणि प्रतिऑक्सिडंट्स भरपूर असलेल्या भाज्यांचा नियमित आहारात समावेश करणे आवश्यक असते. अशा भाज्या शरीराला पोषण देतात, ऊर्जा वाढवतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. विशेष म्हणजे काही भाज्या अशा असतात, ज्यात साखरेचे प्रमाण अत्यंत कमी असते.
१. फ्रेंच बीन्स
मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी फ्रेंच बीन्स ही एक चांगली निवड मानली जाते. या भाजीत उष्मांक कमी असतात आणि तंतुमय घटक मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्याचबरोबर अन्नातील साखर शरीरात शोषली जाण्याचा वेग मंदावू शकतो. या भाजीत प्रतिऑक्सिडंट्स आणि विविध जीवनसत्त्वेही आढळतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी ठेवण्यास मदत होऊ शकते.
२. पालक आणि केल
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक आणि केल यांचा विशेष उल्लेख केला जातो. या भाज्या पोषणमूल्यांनी समृद्ध असून त्यात उष्मांक कमी असतात. कार्बोहायड्रेटचे प्रमाणही अत्यल्प असल्यामुळे रक्तातील साखरेवर त्यांचा फारसा परिणाम होत नाही. जीवनसत्त्व ‘क’ भरपूर प्रमाणात असल्याने या भाज्या शरीरातील पेशींना होणारे नुकसान कमी करण्यास मदत करतात, असे काही अभ्यासांमध्ये सूचित करण्यात आले आहे.
३. भेंडी
भेंडी ही अनेकांच्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी भाजी असली तरी तिचे गुणधर्म लक्षवेधी आहेत. या भाजीत तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात. तसेच विविध जीवनसत्त्वे आणि प्रतिऑक्सिडंट्सही आढळतात. भेंडी खाल्ल्यानंतर पचनक्रियेदरम्यान एक प्रकारचा जेलसदृश थर तयार होतो, ज्यामुळे साखरेचे शरीरात शोषण होण्याचा वेग कमी होऊ शकतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
तज्ज्ञांच्या मते, मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ औषधेच नव्हे तर योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तणावावर नियंत्रण हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे अधिक सोपे होऊ शकते.
(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)
