Ayurvedic Remedies for Good Sleep: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण झोप न लागण्याच्या त्रासाने त्रस्त आहेत. रात्री अंथरुणावर पडूनही डोळ्यांत झोप येत नाही, मन सतत विचारांनी भरलेले असते आणि शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळत नाही. परिणामी अनेक जण झोपेच्या गोळ्यांचा आधार घेऊ लागतात. मात्र, रोज औषधे घेऊन झोप काढणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांनी झोप न लागण्यामागची कारणे सांगत, औषधांशिवाय झोपेची समस्या कमी करण्याचे नैसर्गिक व आयुर्वेदीय उपाय सांगितले आहेत.

बाबा रामदेव यांच्या मते, झोप न येण्यामागे वाढता ताणतणाव, असंतुलित जीवनशैली, अयोग्य आहारविहार आणि मानसिक अस्वस्थता ही प्रमुख कारणे असू शकतात. ही समस्या कोणालाही भेडसावू शकते, पण योग्य सवयी आणि काही साधे उपाय केल्यास झोपेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. विशेष म्हणजे, या उपायांसाठी औषधांची गरज नसून ते नैसर्गिक पद्धतीने शरीराला शांतता देणारे आहेत.

बाबा रामदेव सांगतात की, बदामाचे तेल झोपेच्या समस्येसाठी उपयुक्त ठरू शकते. झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने पायांच्या तळव्यांची हलक्या हाताने मालिश केल्यास शरीरातील तणाव कमी होऊ शकतो. आयुर्वेदात तेलमालिशीला विशेष महत्त्व असून, यामुळे मज्जासंस्था शांत होण्यास मदत होते आणि झोप लवकर लागण्याची शक्यता वाढते.

Award Banner

याशिवाय, झोप वेळेवर यावी यासाठी हातांच्या बोटांवर दाब देण्याचा सल्लाही बाबा रामदेव देतात. प्रत्येक बोट थोड्या वेळ दाबल्यास मनाला शांतता मिळू शकते आणि बेचैनी कमी होऊ शकते. काही लोकांना रात्री अस्वस्थ झोप येते किंवा झोप लागतच नाही, अशा वेळी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.

बाबा रामदेव यांच्या मते, रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात थोडे बदामाचे तेल घालून प्यायल्यास शरीराला आराम मिळू शकतो, यामुळे स्नायू सैल होतात आणि मन शांत होते. तसेच, नियमितपणे अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यास श्वसनक्रिया संतुलित होते, मनावरचा ताण कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

झोप न येण्यामागची कारणेही लक्षात घेणे गरजेचे आहे. सततचा मानसिक ताण, मोबाईल किंवा पडद्यांचा अतिरेक, अयोग्य दिनचर्या, उत्तेजक पेयांचे सेवन, सतत विचार करण्याची सवय आणि झोपेच्या औषधांवर अवलंबून राहणे, या सगळ्यांचा झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

बाबा रामदेव यांचा सल्ला असा आहे की, झोपेची समस्या दूर करण्यासाठी शिस्तबद्ध दिनक्रम पाळणे आवश्यक आहे. आयुष्यात निराशा न बाळगता सकारात्मक विचार ठेवावेत आणि शक्य तितके आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. एकटेपणा आणि सतत चिंता केल्याने मन अस्वस्थ राहते, त्यामुळे झोप येण्यास अडथळा निर्माण होतो; म्हणूनच मन प्रसन्न ठेवणे आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणे, हाच चांगल्या झोपेचा खरा मार्ग ठरू शकतो.

(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)