Madhuri Dixit Husband Fitness Tips: आजच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढणं ही समस्या जवळपास प्रत्येक घरात दिसून येते. वजन कमी करायचं म्हटलं की, इंटरनेटवर असंख्य उपाय दिसतात. कोणी उपवास सुचवतं, कोणी अवघड डाएट प्लॅन, तर कोणी तासन्‌ तास जिममध्ये घाम गाळण्याचा सल्ला देतं. पण खरंच वजन कमी करण्यासाठी इतकं सगळं करावंच लागतं का? याच प्रश्नाचं उत्तर देतात सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने.डॉ. नेने सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर, आरोग्यविषयक मार्गदर्शन सातत्याने देत असतात. त्यांच्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी वजन कमी करण्याबाबत असे काही मुद्दे मांडले आहेत, जे ऐकून अनेकांना दिलासा मिळू शकतो. कारण- हे उपाय अवघड नाहीत, खर्चिक नाहीत आणि सर्वसामान्य माणसालाही सहज करता येण्यासारखे आहेत.

डॉ. नेने यांचं पहिलंच आणि महत्त्वाचं म्हणणं आहे की, वजन कमी करण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवू नका. अनेक जण पटकन वजन कमी व्हावं म्हणून जेवण टाळतात किंवा फारच कमी खातात. पण याचा उलटा परिणाम होतो. शरीराला पुरेसं अन्न न मिळालं की, थकवा येतो, झोप जास्त येते आणि नंतर अचानक गोड किंवा जास्त कार्बोहायड्रेट्स खाण्याची इच्छा होते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि इन्सुलिन स्पाइक होतो, जो वजनवाढीस कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे उपाशी राहण्याऐवजी मोजकं आणि समतोल आहार घेण्यावर भर द्यायला हवा.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वारंवार होणाऱ्या खाण्याच्या क्रेव्हिंग्स. अनेकांना काही वेळानं काहीतरी खावंसं वाटत राहतं. अशा वेळी सतत काहीतरी खात राहण्याऐवजी स्वतःचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सल्ला डॉ. नेने देतात. उदाहरणार्थ- थोडंसं चालणं, एखादं काम करणं, च्युइंगम चघळणं किंवा पाणी पिणं यामुळे खाण्याचा विचार कमी होतो. भूक नसताना फक्त सवयीनं खाणं टाळणं वजन नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचं आहे.

Award Banner

त्यानंतर ते नाश्त्याबाबत एक महत्त्वाचा इशारा देतात. सकाळचा नाश्ता हा दिवसातील सगळ्यात महत्त्वाचा आहार मानला जातो, पण अनेक जण याच वेळी चुकीच्या गोष्टी खातात. डॉ. नेने यांच्या मते, सकाळी पांढरा ब्रेड, साखरयुक्त सीरियल्स, प्रोसेस्ड मांस, गोड योगर्ट व पॅकेटबंद फळांचे रस टाळले पाहिजेत. विशेषतः बाजारात मिळणारे पॅक्ड फळांचे ज्यूस हे दिसायला जरी आरोग्यदायी वाटले तरी त्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, जे वजनवाढीस कारणीभूत ठरू शकतात.

डॉ. नेने यांचा एकंदर संदेश स्पष्ट आहे वजन कमी करणं म्हणजे शरीराला त्रास देणं नव्हे, तर शरीराला समजून घेणं. योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणं, चुकीच्या सवयी टाळणं आणि जीवनशैलीत छोटे, पण शाश्वत बदल करणं यांमुळेही फिट आणि निरोगी राहता येऊ शकतं.

महागडे डाएट प्लॅन किंवा अवघड एक्सरसाइज न करता, जर तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितलेले हे सोपे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)