Sudden Weight Loss Reasons : कोणत्याही वयात चांगल्या आरोग्यासाठी वजन नियंत्रण आवश्यक आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी लोक अनेकदा जिम, डाएटची मदत घेतात. पण, काही लोकांचं डाएट किंवा वर्कआउट न करताही त्यांचे वजन कमी होऊ लागते. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सहा महिन्यांत एकूण शरीराच्या वजनाच्या ५ टक्क्यांहून अधिक घट होणे याला अनएक्सप्लेंड वेट लॉस (Unexplained Weight Loss) म्हणतात. आपण अनेकदा कामाचा थकवा किंवा ताण समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण, त्यामागील कारण मोठे आजार सुद्धा असू शकतात.
कानपूरच्या स्वरूप नगर येथील गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉक्टर व्ही.के. मिश्रा म्हणतात की, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वजन कमी होणे हे अनेक आरोग्य समस्या दर्शवू शकते. म्हणून, मूळ कारण लवकर ओळखणे महत्वाचे आहे. विनाकारण वजन कमी होणे हे केवळ थायरॉईड, मधुमेह, यकृताच्या समस्यांचेच नव्हे तर इतर अनेक मोठ्या आजारांचे लक्षण सुद्धा असू शकतात.
वजन कमी होण्यास कोणत्या गोष्टी जबाबदार असतात?
हायपरथायरॉईडीझम
थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय नियंत्रित करते. जेव्हा ही ग्रंथी गरजेपेक्षा जास्त हार्मोन्स तयार करू लागते, तेव्हा त्या स्थितीला ‘हायपरथायरॉइडिझम’ असे म्हणतात. या अवस्थेत शरीराचा मेटाबॉलिझम खूप वेगाने वाढतो, त्यामुळे शरीरातील कॅलरी पटकन जळतात. यामुळे एखाद्या व्यक्तीचे वजन कमी होऊ शकते. हृदयाची गती वाढणे, चिंता वाटणे, हात थरथरणे, जास्त घाम येणे आणि निद्रानाश यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात. जर या लक्षणांसह जलद वजन कमी होत असेल तर थायरॉईड चाचणी करणे महत्वाचे आहे.
मधुमेह
मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये अचानक वजन कमी होण्याची समस्या दिसू शकते. विशेषतः जेव्हा रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ नियंत्रणात नसते. या परिस्थितीत, शरीर उर्जेसाठी ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाही. परिणामी, शरीर उर्जेसाठी चरबी आणि स्नायू तोडण्यास सुरुवात करते, ज्यामुळे वजन जलद कमी होते. वारंवार लघवी होणे, तहान वाढणे, थकवा येणे, अंधुक दृष्टी यासारखी लक्षणे दिसू शकतात. म्हणूनच, अचानक वजन कमी झाल्यास तुमच्या रक्तातील साखरेची तपासणी करणे महत्वाचे आहे.
नैराश्य किंवा मानसिक ताण
मानसिक आरोग्याचाही शरीराच्या वजनावर परिणाम होतो. नैराश्य, चिंता किंवा दीर्घकाळापर्यंतचा ताण एखाद्या व्यक्तीची भूक कमी करू शकतो. अशा परिस्थितीत बरेच लोक कमी जेवतात किंवा त्यांना जेवावसं वाटत नाही. परिणामी शरीरासाठी अपुरे कॅलरीज, पोषण मिळते, ज्यामुळे हळूहळू वजन कमी होते. थकवा, दुःख, झोपेच्या समस्या, कामात रस नसणे आणि सामाजिक क्रियाकलापांपासून दूर राहणे यासारखी लक्षणे देखील दिसू शकतात.
यकृताच्या समस्या
यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो पचन, पोषक तत्वांचे चयापचय, विषारी पदार्थ काढून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जर यकृत योग्यरित्या कार्य करत नसेल तर शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत. भूक न लागणे, अशक्तपणा, वजन कमी होणे ही फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस किंवा लिव्हर सिरोसिस सारख्या आजारांची सामान्य लक्षणे असू शकतात. लोकांना यकृताच्या आजाराचे निदान बराच काळ होत नाही आणि त्यांचे वजन हळूहळू कमी होते.
आतड्यांसंबंधी समस्या
आतडे अन्नातून पोषक तत्वे योग्यरित्या शोषू घेत नाही. या स्थितीला या स्थितीला मालाब्सॉर्प्शन सिंड्रोम (Malabsorption Syndrome) म्हणतात. मालाब्सॉर्प्शन सिंड्रोमम्हणजे अन्नातून मिळणारे पोषक घटक शरीरात नीट शोषले न जाण्याची समस्या, यामुळे वजन हळूहळू कमी होते. वारंवार अतिसार, पोटदुखी, गॅस, अशक्तपणा आणि कुपोषण अशी लक्षणे देखील दिसू शकतात. अशा परिस्थितीत, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
कर्करोगाचा धोका
अचानक आणि अस्पष्ट वजन कमी होणे हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते. कर्करोगामुळे शरीराची ऊर्जेची गरज वाढते आणि चयापचयात बदल होऊ शकतात, ज्यामुळे वजन कमी होऊ शकते. वजन कमी होणे हे नेहमीच कर्करोगाचे लक्षण नसले तरी, जर सतत अशक्तपणा, भूक न लागणे, वेदना किंवा इतर असामान्य लक्षणे असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
