kidney stones: भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटोचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भाज्यांमध्ये घालण्यापासून ते सूप, चटण्या आणि सॅलेडपर्यंत आपण दररोज टोमॅटो खातो. तथापि, टोमॅटोबद्दल एक सामान्य गैरसमज असा आहे की, टोमॅटोच्या बिया खाल्ल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. विशेषतः सोशल मीडियावर असे म्हटले जाते की टोमॅटोच्या लहान, कठीण बियांमध्ये ऑक्सॅलेट्स असतात, ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतात. यामुळेच बरेच लोक टोमॅटो सॅलेड खाणे टाळतात आणि भाज्यांमध्ये टोमॅटोच्या बिया काढूनच घालतात. पण, यात काही तथ्य आहे का? आरोग्य तज्ज्ञांचे यावर काय म्हणणे आहे? चला जाणून घेऊया.
टोमॅटोच्या बिया खाल्ल्याने किडनी स्टोन होतो का?
असे म्हटले जाते की टोमॅटोच्या बियांमध्ये ऑक्झॅलेट असते, ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतात. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लिमा महाजन स्पष्ट करतात की, ऑक्झॅलेट केवळ बियांमध्येच नव्हे तर टोमॅटोच्या गरातही आढळते, त्यामुळे बिया काढल्यानंतर टोमॅटो पूर्णपणे ऑक्झॅलेट-मुक्त असतो असे म्हणणे चुकीचे ठरेल. तथापि, एका मध्यम आकाराच्या टोमॅटोमध्ये फक्त ५-७ ग्रॅम ऑक्झॅलेट असते, जे एक कप पालकापेक्षा खूपच कमी आहे.
टोमॅटोमध्ये असलेले सायट्रेट खडे तयार होण्यास प्रतिबंध करू शकते
पोषणतज्ज्ञांच्या मते, टोमॅटोमध्ये सायट्रेट असते, जे खडे तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करू शकते. सायट्रेट लघवीतील कॅल्शियमला बांधून ठेवू शकते. यामुळे कॅल्शियम आणि ऑक्झॅलेटची कॅल्शियम ऑक्झॅलेट स्फटिक तयार करण्याची, वाढण्याची आणि त्यांना बांधून ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते, म्हणूनच काही लोकांमध्ये पुरेसे सायट्रेट सेवन केल्याने कॅल्शियम ऑक्झॅलेटचे खडे तयार होण्याची प्रक्रिया मंदावू शकते.
जर तुम्हाला किडनी स्टोनची चिंता वाटत असेल तर हा उपाय करा
जर तुम्हाला किडनी स्टोनची चिंता वाटत असेल तर कॅल्शियमयुक्त किंवा ऑक्झॅलेटयुक्त पदार्थ पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. आहारतज्ज्ञ कॅल्शियम आणि ऑक्झॅलेटयुक्त पदार्थ एकाच जेवणात एकत्र खाण्याचा सल्ला देतात. यामुळे तुमच्या शरीरात शोषल्या जाणाऱ्या ऑक्झॅलेटचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, ज्यामुळे ते तुमच्या किडनीपर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होईल. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या रोजच्या पिण्याच्या पाण्याचे प्रमाणदेखील वाढवू शकता.
आहारातून टोमॅटो वगळणे आवश्यक नाही
पोषणतज्ज्ञ असा सल्ला देतात की, किडनी स्टोनच्या भीतीमुळे टोमॅटो पूर्णपणे टाळणे किंवा बिया काढून खाणे योग्य नाही. त्याऐवजी, तुमच्या एकूण आहाराकडे, हायड्रेशनकडे, सोडियमच्या सेवनाकडे आणि कॅल्शियमच्या सेवनाकडे लक्ष द्या. तसेच हे लक्षात ठेवा की, टोमॅटो हे किडनी स्टोनवरचा उपाय नाही. तथापि, जर तुम्ही केवळ त्यातील ऑक्सलेटच्या प्रमाणामुळे टोमॅटो खाणे टाळत असाल तर तसे करणे थांबवा.
