Homemade Oil for Knee Pain Relief and Strong Bones: संपूर्ण देशात सध्या कडाक्याची थंडी जाणवते आहे. काहींसाठी हिवाळा आनंददायी असतो, तर अनेकांसाठी हा ऋतू त्रासदायक ठरतो. विशेषतः ज्यांना गुडघ्यांचे किंवा सांध्यांचे दुखणे आहे, त्यांच्यासाठी थंडी म्हणजे वेदनांचा काळ. चालणे, जिने चढणे-उतरणे, उठणे-बसणे यांसारख्या साध्या हालचालीही या दिवसांत कठीण होतात. त्यामुळे हा ऋतू लवकर संपावा, अशीच अनेकांची इच्छा असते.

मात्र, ऋतू बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा वेदनांवर काहीतरी उपाय करता आला तर? औषधांवर अवलंबून न राहता, घरच्या घरीच तयार करता येईल असा एक जुना आयुर्वेदीय उपाय सध्या चर्चेत आहे. हा उपाय वेदना कमी करण्यास मदत करू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

थंडीत गुडघ्यांचे दुखणे का वाढते?

उन्हाळ्यात जे दुखणे काही प्रमाणात सहन होण्यासारखे असते, तेच हिवाळा सुरू होताच तीव्र होते. यामागचे कारण स्पष्ट करताना तज्ज्ञ सांगतात की, थंड वातावरणात स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात. त्यामुळे जडपणा, सूज आणि वेदना वाढू शकतात. थंडीमुळे हात-पायांतील रक्तप्रवाह मंदावतो, शरीराची दुरुस्ती प्रक्रिया संथ होते आणि परिणामी वेदना अधिक जाणवतात. याच कारणामुळे गुडघे व इतर सांध्यांचे दुखणे हिवाळ्यात वाढलेले दिसते.

तज्ज्ञ काय सांगतात?

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी समाजमाध्यमांवरील एका ध्वनिचित्रफितीत सांध्यांच्या वेदनांसाठी उपयुक्त ठरू शकणारा आयुर्वेदीय उपाय सांगितला आहे. त्यांच्या मते, हा उपाय जुना असून अनेक वर्षांपासून वापरात आहे. योग्य पद्धतीनं तयार केलेल्या तेलानं नियमित मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होऊ शकते.

गुडघ्यांच्या वेदनांसाठी घरगुती उपाय

हा उपाय म्हणजे लवंगयुक्त आयुर्वेदीय तेल. विशेष बाब म्हणजे हे तेल तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू सहज घरात मिळणाऱ्या आहेत.

तेलासाठी लागणारी सामग्री

एक कप मोहरीचे तेल, एक मोठा चमचा ओवा, एक मोठा चमचा लवंग, सहा ते सात लसूण पाकळ्या, दोन मोठे चमचे मेथी दाणे, कच्च्या हळदीचे काही तुकडे व एक मोठा चमचा कापूर पूड.

तेल तयार करण्याची पद्धत

प्रथम कढईत मोहरीचे तेल घालून, ते दोन मिनिटे गरम करावे. त्यानंतर सर्व साहित्य एकामागोमाग एक घालावे. हे मिश्रण मंद आचेवर सुमारे २० ते २५ मिनिटे गरम करावे. नंतर तेल गार झाल्यावर गाळून घ्यावे. हे तेल हवाबंद डब्यात ठेवले, तर दोन ते तीन महिने वापरता येते.

या तेलाचे संभाव्य फायदे

किरण कुकरेजा सांगतात की, हिवाळ्यात शरीरातील वातदोष वाढण्याची शक्यता असते. या तेलातील घटक वातदोष संतुलित ठेवण्यास मदत करू शकतात. या तेलाने मालिश केल्याने सांध्यांचा जडपणा कमी होतो, सूज आटोक्यात येण्यास मदत होते आणि शरीराला उबदारपणा मिळतो. या तेलाचा नियमितपणे वापर केल्यास गुडघे आणि इतर सांध्यांतील वेदनांपासून दिलासा मिळू शकतो.

महत्त्वाची सूचना

हा उपाय सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही आजार असल्यास किंवा वेदना तीव्र असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कोणताही घरगुती उपाय वैद्यकीय उपचारांना पर्याय ठरू शकत नाही. संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला यांचाही विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे.