Natural Remedy for Bone Strength: आजकाल अनेकांना ३० ते ४० वयोगटातच हाडांतून कट-कट आवाज येणे, गुडघेदुखी, उठताना-बसताना त्रास अशा समस्या जाणवू लागल्या आहेत. पूर्वी अशा समस्या वयोमानानुसार दिसायच्या; मात्र बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव यांमुळे आता तरुण वयातही हाडे कमकुवत होण्याची समस्या वाढताना दिसते.
तज्ज्ञांच्या मते, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता ही हाडांच्या कमकुवतपणामागील मुख्य कारणांपैकी एक आहे. शरीरातील कॅल्शियम कमी झाल्यास हाडे हळूहळू पोकळ आणि ठिसूळ होऊ लागतात. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे त्याची कमतरता असेल, तर हाडांची घनता कमी होते आणि सांधेदुखीचा त्रास वाढतो.
विशेषत: महिलांना ३० ते ४० वयानंतर हाडदुखीचा त्रास अधिक जाणवतो. कारण- या काळात शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचे प्रमाण कमी होऊ लागते, ज्याचा थेट परिणाम हाडांच्या मजबुतीवर होतो. त्याशिवाय दिवसभर बसून काम करणे, व्यायाम न करणे, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स व प्रोसेस्ड पदार्थांचे जास्त सेवन हे घटकही हाडांतील महत्त्वाची खनिजे कमी करतात.
पण, अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे निसर्गात अशी काही औषधी वनस्पती आहेत, ज्या हाडांना आतून बळकट करण्यास मदत करू शकतात.
प्राचीन काळापासून भारतात रोगांवरील उपचारासाठी औषधी वनस्पती आणि वनस्पतींचा वापर केला जातो. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली फुले, पाने व फळे आयुर्वेदिक औषधात वापरली जातात. अनेक नैसर्गिक गोष्टींमध्ये शक्तिशाली पोषक घटक असतात, जे औषधासारखे कार्य करतात.
आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि योगगुरूंच्या मते, आपल्या स्वयंपाकघरात किंवा अंगणात सहज उपलब्ध असणाऱ्या एका विशेष वनस्पतीच्या पानांमध्ये हाडांसाठी आवश्यक असलेले कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन्स व अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. ही पाने केवळ हाडे मजबूत करण्यासाठीच नाही, तर नसांची कमजोरी कमी करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठीही प्रभावी मानली जातात.
या पानांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते. काही संशोधनांनुसार १०० ग्रॅम ताज्या पानांमध्ये जवळपास ४०० ते ४५० मिलिग्रॅम कॅल्शियम असू शकते. त्यामुळे हाडांची घनता वाढण्यास मदत होते आणि फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. त्याशिवाय यात मॅग्नेशियम, फॉस्फरस व पोटॅशियमसारखे महत्त्वाचे खनिज घटकही असतात, जे हाडांना मजबूत ठेवतात.
त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारे घटक शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सांध्यांमधील वेदना, कडकपणा आणि आर्थरायटिससारख्या समस्यांमध्येही काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
आता प्रश्न असा पडतो की, ही चमत्कारी पाने कोणती?
तज्ज्ञांच्या मते, हाडांसाठी अतिशय उपयुक्त असलेली ही पाने म्हणजे सहजन अर्थात मोरिंगा (Moringa) ची पाने. मोरिंगाला ‘सुपरफूड’ म्हणूनही ओळखले जाते. कारण- त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक घटक आढळतात.
मोरिंगाच्या पानांचे सेवन करण्यासाठी काही सोपे उपायही सांगितले जातात.
- सकाळी रिकाम्या पोटी मोरिंगाच्या पानांचा रस पिणे
- मोरिंगाची भाजी किंवा सूप बनवून खाणे
- मोरिंगा पावडर आहारात समाविष्ट करणे
- मोरिंगा चहा पिणे
नियमित आणि संतुलित आहारासोबत या पानांचा वापर केल्यास हाडे मजबूत ठेवण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
