How to Choose Sweet Watermelon: उन्हाळा सुरू झाला की, बाजारात ताज्या, रसाळ फळांची रेलचेल वाढते आणि त्यात सर्वांत जास्त मागणी असते ती थंडावा देणाऱ्या कलिंगडाची. कडक उन्हात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड खूप उपयोगी ठरतं. मात्र, अनेकदा आपण बाजारातून कलिंगड घेऊन येतो आणि घरी कापल्यावर ते फिकं किंवा कमी गोड निघतं आणि मग मग सगळे पैसे वाया गेल्याने फसवले गेल्यासारखे वाटून काही वेळासाठी का होईना उदासीनतेची पडछाया आपल्या मनाला ग्रासून राहते.
पण, आता काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या आणि भन्नाट देशी युक्त्या वापरून तुम्ही कलिंगड न कापताही ते गोड आहे की नाही, हे सहजपणे ओळखू शकता. या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तुम्ही प्रत्येक वेळी योग्य आणि गोड कलिंगडच घरी आणल्याचं समाधान मिळवू शकता. त्यामुळे उत्तरोत्तर तुमची निवड बिनचूक ठरत असल्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत जाईल.
कलिंगड घेताना चुका टाळा! गोड फळ ओळखण्याची ‘ही’ सोपी पद्धत
१. रंग सांगतो गोडीचं रहस्य
कलिंगडाच्या बाहेरील रंगाकडे नीट लक्ष दिलं, तर त्याच्या गोडीचं रहस्य समजू शकतं. जर कलिंगडावर पिवळसर रंगाचा मोठा डाग (पॅच) दिसत असेल, तर समजून घ्या की, ते कलिंगड जमिनीवर पुरेसा वेळ राहून चांगल्या रीतीनं पिकलेलं आहे. असं कलिंगड साधारणतः गोड आणि रसाळ असण्याची शक्यता अधिक असते. उलट खूपच पांढरट किंवा हिरवट डाग असलेलं कलिंगड कच्चं असू शकतं.
२. सुगंधामध्ये दडलाय गोडवा
तुम्ही कधी कलिंगडाचा वास घेऊन पाहिलाय का? हे थोडं वेगळं वाटेल, पण खरं आहे. पिकलेल्या कलिंगडातून हलका, गोडसर आणि ताजेपणाचा सुगंध येतो. जर तुम्हाला अशा प्रकारचा नैसर्गिक सुगंध जाणवला, तर ते कलिंगड चवीलाही गोड असण्याची शक्यता असते. त्याउलट वास अजिबात न येणं किंवा विचित्र वास येणं म्हणजे ते कलिंगड पूर्ण पिकलेलं नसण्याची अधिक शक्यता असते.
३. वजनातून कळतो रसाळपणा
कलिंगड हातात घेतल्यावर ते त्याच्या आकाराच्या मानानं जड वाटलं, तर ते चांगलं पिकलेलं आणि पाण्यानं भरलेलं असू शकतं. जड कलिंगडामध्ये अधिक रस असतो आणि ते गोड लागण्याची जास्त शक्यता असते. हलकं वाटणारं कलिंगड मात्र कोरडं किंवा कमी गोड असू शकतं.
४. देठामुळे मिळतो ओळखीचा संकेत
कलिंगडाचा देठही खूप महत्त्वाचा संकेत देतो. जर देठ पूर्णपणे सुकलेला दिसत असेल, तर समजून जा की, ते फळ व्यवस्थित पिकलेलं आहे; पण जर देठ हिरवा आणि ताजा दिसत असेल, तर ते कलिंगड अजून कच्चं असण्याची शक्यता असते. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना नेहमी सुकलेल्या देठाचं कलिंगड निवडणं फायदेशीर ठरू शकतं.
महत्त्वाची सूचना
ही माहिती सामान्य ज्ञान आणि पारंपरिक अनुभवांवर आधारित आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस १००% अचूक परिणाम मिळेलच, असं नाही; मात्र या ट्रिक्स वापरल्यास गोड कलिंगड हाती लागण्याची शक्यता नक्कीच वाढू शकते.
पुढच्या वेळी बाजारात गेल्यावर या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवा आणि प्रत्येक वेळी गोड, रसाळ कलिंगडच घरी आणा!
