How Much Water Drink In Summer : मार्च महिन्यापासूनच तीव्र उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत शरीराला पाणीच उष्णतेपासून वाचवू शकते. कधी कधी पाणी प्यायल्यानंतरही तोंड कोरडे पडते आणि तहान कायम राहते. काही लोक एकाच वेळी घटाघट पाणी पितात आणि मधले काही तास पाणी न पिताच राहतात. अशाने शरीराची पाण्याची गरज योग्यरीत्या पूर्ण होत नाही आणि एकाच वेळी खूप तहानल्यासारखे वाटते. त्यामुळे उन्हाळ्यात किती आणि केव्हा पाणी प्यावे याबाबत संभ्रम असतो. अशा वेळी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ते जाणून घेऊ…
आहारतज्ज्ञ स्वाती सिंग यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असलेल्या पाण्याची मात्रा त्यांच्या आरोग्यासह शारीरिक हालचालींच्या पातळीवर अवलंबून असते. जर तुम्ही खूप शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल आणि दिवसभर तुम्हाला भरपूर घाम येत असेल, तर तुम्हाला सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त पाण्याची गरज भासू शकते. जर तुम्ही ऑफिसमध्ये एसीत बसून काम करत असाल, तर तुम्हाला सामान्य व्यक्तीपेक्षा कमी पाण्याची गरज भासू शकते.
शरीर ‘अशाप्रकारे’ सांगते पाण्याची गरज आहे
शरीर तहान लागण्याच्या माध्यमातून पाणी पिण्याची गरज असल्याचे संकेत देते. जर तुमचे ओठ कोरडे पडले असतील, घसा कोरडा पडला असेल आणि तुम्हाला तहान लागली असेल, तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे. जर तुमची लघवी खूप पिवळी असेल, तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे. जेव्हा तुम्हाला तहान लागेल, तेव्हा लगेच पाणी प्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहील.
उन्हाळ्यात आपण किती वेळा पाणी प्यावे?
उन्हात बाहेर जाण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे. तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा व्यायाम करत असाल, तर आधीच एक ग्लास पाणी प्या. व्यायामाच्या मधल्या वेळेत थोडे थोडे पाणी पीत राहा. जेवणाच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर पाणी प्या. एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी दर १-२ तासांनी थोडे थोडे पाणी पिणे चांगले.
उन्हाळ्यात किती पाणी प्यावे?
उन्हाळ्यात दिवसभरात २-३ लिटर पाणी पिणे गरजेचे असते. त्यात पुरुषांना दिवसभरात सुमारे तीन लिटर पाणी पिणे गरजेचे असते; तर महिलांनी दोन ते अडीच लिटर आणि मुलांनी एक लिटर पाणी प्यावे, असे सांगितले जाते. तसेच मुले दिवसभरात खूप खेळत असतील किंवा शारीरिक हालचाली करत असतील, तर त्यांनी दिवसभरात दीड ते दोन लिटर पाणी पिणे गरजेचे असते. जर तुम्हाला मूत्रपिंड किंवा हृदयाशी संबंधित कोणताही आजार असेल, तर तुम्ही पुरेसे पाणी पिण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
