Benefits Of Onion In Summer: उन्हाळ्यात अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे या तीव्र उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आहारात बदल करणे अत्यावश्यक ठरते. उष्माघात टाळण्यासाठी उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र रोज कच्चा कांदा खाणे खरोखरच प्रत्येकासाठी फायदेशीर आहे का याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, कांदा ही केवळ एक चविष्ट भाजी नसून आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात सल्फर संयुगे आणि क्वेर्सेटिनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास आणि दाह कमी करण्यास मदत करतात. समग्र आहारतज्ज्ञांच्या मते, कांदा शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे अनेक जुनाट आजारांचा धोका कमी होऊ शकतो. उन्हाळ्यात नियमितपणे कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते. तर मग जाणून घेऊया की उन्हाळ्यात कांद्याचे सेवन आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे…

उन्हाळ्यात कांद्याचे शरीराला काय फायदे होतात?

उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, कांद्यामध्ये असलेले एक विशिष्ट रसायन तीव्र उष्णता आणि उष्माघातापासून संरक्षण करते. जर्नल ऑफ क्लिनिकल बायोकेमिस्ट्री अँड न्यूट्रिशननुसार, कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचा एक शक्तिशाली फ्लेव्होनॉइड असतो. तो शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित ठेवण्यास मदत करतो. उन्हाळ्यात जेव्हा बाहेरील तापमान वाढते, तेव्हा कांद्याचा अर्क घाम ग्रंथींना सक्रिय करून शरीर नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करतो.

Award Banner

कांद्यामध्ये अॅलिसिनसारखी गंधकयुक्त संयुगे असतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. उन्हाळ्यात अनेकदा रक्त घट्ट होते किंवा रक्तवाहिन्या ताणल्या जातात. कांदा हे टाळण्यास मदत करतो. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील खनिजे कमी होतात. कांदा या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करते. यामुळे थकवा आणि अशक्तपणा टाळता येतो. कांद्यामध्ये इन्युलिन नावाचे प्रीबायोटिक फायबर असते, ते पचनक्रिया योग्य राखण्यास मदत करते.

उन्हाळ्यात कांद्याचे फायदे

आतड्यांचे आरोग्य सुधारते- कांद्यामधील फायबर चांगल्या जीवाणूंना अन्न पुरवते. यामुळे आतड्यांचे संतुलन सुधारते आणि पचनसंस्था मजबूत होते. संपूर्ण आरोग्यासाठी निरोगी आतडे असणे अत्यंत गरजेचे आहे.

रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध- कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. ते रक्त पातळ ठेवण्यास मदत करतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या आणि हार्टसंबंधित आजारांचा धोका कमी होतो.

हृदयाचे आरोग्य राखते- कच्चा कांदा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. तो रक्ताभिसरण सुधारतो आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतो.

सूज कमी होण्यास मदत करतो- कांद्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

पचनशक्ती वाढवते- नियमितपणे कच्चा कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असते. त्यामुळे दररोज अर्धा ते एक चमचा एवढ्या प्रमाणात कांदा खाणे पुरेसे मानले जाते. जर कोणाला पित्त, गॅस किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोमसारख्या समस्या असतील, तर कच्चा कांदा खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.