रविवारी रात्री उशीरापर्यंत केलेल्या जागरणामुळे जवळजवळ ७५ टक्के लोकांना दुस-या दिवशी कामावर येताना तणाव जाणवत असल्याचे अलीकडेच केलेल्या एका पाहणीत आढळून आले. यातील अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना एवढा ताण जाणवतो, की त्यांना नोकरी बदलाविशी वाटते. या सर्वेक्षणात जगभरातील ३६०० पेक्षा अधिक कामगारांचा समावेश करण्यात आला. बहुतांश कामगारांची रविवार रात्र ही चिंतेने ग्रासलेली असल्याचे या पाहणीत आढळून आले. नोकरीविषयीच्या एका ऑनलाईन वेबसाईटने केलेल्या पाहणीत केवळ २२ टक्के लोकांनी आठवड्याच्या शेवटी साप्ताहिक सुटीनंतर दुस-या दिवशी कामावर जाताना आपल्याला तणावग्रस्त वाटत नसल्याचे सांगितले. ‘बिझनेस न्यूज डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘मॉन्स्टर डॉट कॉम’च्या व्यवसाय मार्गदर्शक मेरी एलेन स्लॅटेर म्हणाल्या, सोमवारची सकाळ ही कामावर जाण्याच्या तणावाने भरलेली असल्याने साप्ताहिक सुटीचा दिवस संपूच नये, असे अनेकांना वाटते. पुढे त्या म्हणाल्या, साप्ताहिक सुटीनंतर दुस-या दिवशी कामावर हजर राहण्यासाठीचा असलेला ताण कमी करण्यासाठी कामाच्या ठिकाणी शुक्रवारीच अधिक वेळ देऊन पुढील आठवड्याचे नियोजन करावे.