Healthy Seeds For Your Health : आहारतज्ज्ञ लवलीन कौर यांनी नुकतीच आपली ‘सकाळची दिनचर्या’ (sacred morning ritual) सर्वांबरोबर शेअर केली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ही दिनचर्या एक संपूर्ण पोषण देणारे पॅकेज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भोपळा, टरबूज (मस्कमेलन) व खसखस यापैकी कोणत्याही बिया एक चमचा घेऊन, त्या रात्री भिजत ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा. कारण- सकाळपर्यंत त्या अंकुरित होतील, ज्यामुळे त्या पचण्यास अधिक सोप्या ठरतात. त्यामध्ये सोल्युबल फायबर (विद्रव्य तंतू) वाढतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टाळायला मदत होते. तसेच, काळे मनुकेही भिजत घाला. कारण – तेही लोहाचा (iron) एक उत्तम स्रोत असतात, असे त्यांनी ‘YouTube Shorts’वरील एका व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

पण, या बियांचे सेवन करण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पहाटे रिकाम्या पोटी. त्यामुळे या सवयीला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवा. आहारतज्ज्ञ लवलीन कौर यांची तजेलदार त्वचा, केसांचा पोत किंवा दिवसभर उत्साही राहण्याचे हेच गुपित आहे. त्यातच हे पदार्थ सर्व वयोगटांसाठी उपयुक्त ठरतात. तर, याबद्दल खात्री करण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार व आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्याशी संपर्क साधला.

भोपळा, टरबुज बिया, खसखस ​​आणि काळ्या मनुका भिजवून, त्यांच्या मिश्रणाचे जर मर्यादित प्रमाणात सेवन केले, तर तो आहार पौष्टीक आणि ताकद देणारा ठरू शकतो. असे पदार्थ एकत्रितपणे वनस्पतीजन्य प्रथिने, आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ आणि आवश्यक असे सूक्ष्म पोषक घटक यांचा शरीराला पुरवठा करतात, जे पोषण सर्व वयोगटांतील व्यक्तींच्या सर्वांगीण आरोग्यासाठी पूरक ठरते.

भोपळ्याच्या बियांमध्ये विशेषतः प्रथिने, मॅग्नेशियम, झिंक, लोह भरपूर प्रमाणात असते. ही पोषक तत्त्वे रोगप्रतिकार शक्ती, हृदयाचे आरोग्य व स्नायूंची पुनर्प्राप्ती यांसाठी मदत करतात. या बियांमध्ये आरोग्यदायी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्सदेखील असतात, जे दाह कमी करण्यास आणि चयापचय आरोग्यास मदत करू शकतात.

टरबुजाच्या (मस्कसमेलन) बिया पोषक तत्त्वांचा एक खजिना आहेत, ज्यातून प्रथिने, फायबर मिळतात. त्यामुळे स्नायू (मसल्स) दुरुस्ती आणि शरीरातील ऊती (टिश्यू) वाढविण्यासाठी त्या खूप उत्कृष्ट ठरतात. त्यामध्ये आरोग्यदायी चरबी (अनसॅच्युरेटेड फॅट्स)देखील असते, जी कोलेस्ट्रॉलचे संतुलन सुधारण्यासह हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकते.

गोयल यांनी नमूद केले की, खसखस ही कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह व जस्त यांसारख्या खनिजांनी समृद्ध असते. ही खनिजे हाडांचे आरोग्य, मज्जातंतूंचे कार्य व चयापचयी ऊर्जा (energy metabolism) यांसाठी उपयुक्त ठरतात. त्यांमध्ये आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ (fats) आणि अल्प प्रमाणात वनस्पतीजन्य प्रथिनांचाही समावेश असतो, ज्यामुळे या मिश्रणाच्या पौष्टिक मूल्यात भर पडते.

काळ्या मनुक्यांमध्ये नैसर्गिक गोडव्याबरोबर लोह, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्सही मिळतात. त्यामधील तंतुमय घटकाच्या प्रमाणामुळे पचनसंस्थेच्या आरोग्यास मदत होते आणि संतुलित आहारात त्यांचा समावेश केल्यास हिमोग्लोबिनची पातळी चांगली राखण्यासही मदत होऊ शकते. या बियांना रात्रभर भिजत ठेवल्याने त्या मऊ होतात. त्यामुळे काही लोकांना पचण्यास त्या सोप्या ठरतात. पण, भिजत ठेवल्याने जरी त्यांचा पोत आणि पचन क्षमता सुधारत असली तरीही भिजत न ठेवताही या बियांचे पौष्टिक मूल्य तितकेच फायदेशीर राहते.

आहाराचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. बियांमध्ये आरोग्यदायी स्निग्ध पदार्थांचे (healthy fats) प्रमाण अधिक असल्याने त्या कॅलरीजने समृद्ध असतात. त्यामुळे त्यांचे अति सेवन केल्यास शरीरात अनावश्यक कॅलरीज घेतल्या जाण्याचा धोका असतो. साधारणपणे एक ते दोन चमचे मिश्र बिया आणि त्याबरोबर थोडे मनुके इतके अल्प प्रमाणही फायदे मिळवून देण्यासाठी पुरेसे ठरते. एकंदरीत, सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी आपल्या आहारात सूक्ष्म पोषक तत्त्वे (micronutrients), आरोग्यदायी स्निग्ध पदार्थ आणि वनस्पतीजन्य प्रथिनांचा समावेश करण्याचा हा एक सोपा मार्ग ठरू शकतो. मात्र, हा उपाय नियमित जेवणाची जागा घेण्याऐवजी एका संतुलित आहाराला पूरक ठरेल अशा पद्धतीनेच अमलात आणला पाहिजे हेही विसरून चालणार नाही.