Supriya Pathare Blood Sugar Control Tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मधुमेह अर्थात शुगर हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक ठरत आहे. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित मानला जाणारा हा आजार आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसू लागला आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि बदललेली जीवनशैली यांमुळे भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

विशेष म्हणजे अनेकांना मधुमेहाची सुरुवातीची लक्षणेही लक्षात येत नाहीत. सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा जाणवणे, वजन कमी होणे किंवा दृष्टी धूसर होणे यांसारखी लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. परिणामी, हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो.

अशा परिस्थितीत अनेक जण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाय शोधत असतात. आहारात बदल, नियमित व्यायाम, औषधे आणि जीवनशैलीतील सुधारणा यांवर भर दिला जातो. मात्र, काही लोक आपल्या दैनंदिन सवयींमध्ये असे काही बदल करतात, ज्यामुळे त्यांना दीर्घकाळ फायदा होत असल्याचे अनुभवातून दिसून येते.

याच पार्श्वभूमीवर मराठी मनोरंजन विश्वातील लोक,प्रिय अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांच्या आरोग्यविषयक काही सवयींबाबत केलेला खुलासा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुप्रिया पाठारे यांनी आपल्या उत्साही स्वभाव आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत; पण त्यांच्या आरोग्याबाबतची एक महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहीत नव्हती.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांना अनेक वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. मात्र, या काळात त्यांनी काही ठरावीक सवयी अंगीकारल्या असून, त्याचा त्यांना फायदा झाल्याचे त्या सांगतात.

सुप्रिया पाठारे यांनी सांगितले की, त्यांना ब्लॅक कॉफी अधिक आवडते. साध्या कॉफीमध्ये साखर घालण्यापेक्षा साखरविरहित आणि स्ट्राँग कॉफी पिण्याला त्या प्राधान्य देतात. तसेच त्यांच्या घरात चहामध्ये परिष्कृत साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो.

मात्र, त्यांच्या आरोग्याच्या दिनचर्येतील सर्वांत लक्षवेधी बाब पुढे आली ती त्यांच्या विशेष कॉफीमुळे. सुप्रिया पाठारे यांनी सांगितले की, गेली जवळपास २८ वर्षे त्या रेड मशरूमयुक्त कॉफीचे सेवन करीत आहेत. त्यांच्या मते, या कॉफीमुळे शरीराला काही प्रमाणात डिटॉक्स होण्यास मदत मिळते. तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही तिचा फायदा होऊ शकतो. सतत नेहमीची ब्लॅक कॉफी पिण्याऐवजी हा पर्याय अधिक चांगला वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे मधुमेह असूनही त्या आहारावर नियंत्रण ठेवत, आवडीचे पदार्थही खातात. त्यांचे मत स्पष्ट आहे की, कोणतीही गोष्ट प्रमाणात आणि शिस्तीत घेतली, तर आरोग्य सांभाळणं शक्य होतं.

आज वाढत्या शुगरच्या समस्येमुळे अनेक जण चिंतेत असताना सुप्रिया पाठारे यांनी सांगितलेला हा अनुभव आणि त्यांची आरोग्याबाबतची शिस्त अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मात्र तज्ज्ञांच्या मते, कोणताही उपाय हा वैद्यकीय उपचारांना पर्याय ठरू शकत नाही. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार आवश्यक असतात. तरीही सुप्रिया पाठारे यांनी सांगितलेल्या सवयींमुळे अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.