Healthy Heart Diet Plan : बदलती हानिकारक जीवनशैली आणि धकाधकीचे जीवन यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यात कामाचा ताण, अपुरी झोप आणि कौटुंबिक समस्या यांमुळे हृदयावर घातक परिणाम होतायत. त्यामुळे हल्ली तरुण वयातच हदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढतेय. त्यामुळे हृदय उत्तम स्थितीत राखण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनने (AHA) हृदयासाठी त्यांच्या मार्गदर्शन तत्त्वांमध्ये एक नवा डाएट प्लॅन सांगितला आहे. सर्क्युलेशन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेली ही मार्गदर्शक तत्त्वे २०२१ च्या पूर्वीच्या शिफारशीनंतर आता अद्ययावत करण्यात आली आहे. त्यात संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीवर? भर देण्यात आला आहे.
हृदयरोग तज्ज्ञांनी हृदयाचे आरोग्य उत्तम स्थितीत राहण्यासाठी आहारात कोणते बदल सुचवले आहेत ते जाणून घेऊ…
बंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटलचे प्रमुख हृदयरोग तज्ज्ञ व वैद्यकीय संचालक डॉ. रंजन शेट्टी यांनी सांगितले की, नवीन मार्गदर्शक तत्त्वांमधील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारात लवकरात लवकर बदल करणे, जरी एएचएने (AHA) ते बदल किती लवकर सुरू करावेत हे स्पष्ट केले नसले तरी स्त्रीने गरोदरपणापासूनच आरोग्यदायी आहाराचे सेवन करणे अत्यावश्यक आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मीठ आणि साखर जास्त असलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत, असा सल्ला दिला आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांत मद्यपान करणे अतिशय घातक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे, तसेच जे मद्यपान करतात त्यांनी त्याचे सेवन तत्काळ कमी करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, हृदयविकार टाळण्यासाठी चांगला आहार, व्यायाम आणि वजन व्यवस्थापन या गोष्टींवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला गेला आहे.
संतुलित आहार हृदयासाठी कसा फायदेशीर?
हृदय निरोगी राहावे यासाठी लहानपणापासूनच संतुलित आहार घेण्याच्या महत्त्वावर एएचएच्या (AHA) नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये भर देण्यात आला आहे. लहानपणीच जर तुम्ही खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावल्या, तर तुम्ही भविष्यात कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या टाळू शकता.
ह्रदयाच्या निरोगी आरोग्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये?
| कॅटेगरी | काय खावे | काय खाऊ नये |
| १) फळ, भाज्या | अधिक प्रमाणात फळ आणि भाज्या खा. | – |
| २) तृणधान्य | आहारात तृणधान्यांचा समावेश करा. | प्रक्रिया केलेले धान्य खाणं टाळा. |
| ३) प्रोटीन | डाळी, कडधान्य आणि सुकामेवा खा. | जास्त मासांहारी पदार्थ खाऊ नका. |
| ४) फॅट | हेल्दी फॅट, जसे की ऑलिव्ह तेल, सुकामेवा खा. | सॅच्युरेटेड फॅट खाणं टाळा. |
| ५) प्रक्रिया केलेले अन्न | ताजे आणि घरगुती जेवण खा. | प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले पदार्थ टाळा. |
| ६) मीठ आणि साखर | मर्यादित प्रमाणात सेवन करा | अतिरिक्त मीठ आणि साखर खाणे टाळा |
| ७) मांसाहारी पर्याय | मासे आणि सी फूड हे उत्तम पर्याय आहेत. | प्रक्रिया केलेले मासांहारी पदार्थ टाळा. |
आहार आणि व्यायामाचा समतोल आवश्यक
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तुम्ही जेवढ्या उष्मांकांचे सेवन करता, तेवढे खर्चही केले पाहिजेत. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार या गोष्टी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात. तुमच्या दैनंदिन जीवनात स्नायूंची ताकद वाढवणाऱ्या व्यायामांचा समावेश करण्याची शिफारसदेखील नवीन मार्गदर्शक तत्त्वे करतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी आहारासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी बालपणातच चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. गरोदरपणात आईच्या आहाराचाही मुलाच्या भविष्यातील आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वयात आरोग्यदायी आहार घेणे महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे पालन केल्याने हृदयविकार मोठ्या प्रमाणात टाळता येतो. सवयींमधील छोटे बदलही मोठे फायदे देऊ शकतात.
