Sweet Craving: आपल्या भारतीय आहारात गोड पदार्थांना विशेष महत्त्व आहे. सण-उत्सव, धार्मिक विधी, वाढदिवस, लग्न समारंभ किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग असो, त्याची सुरुवात किंवा सांगता अनेकदा गोड पदार्थांनीच केली जाते. लाडू, जिलेबी, मोदक, श्रीखंड, खीर, पुरणपोळी, गुलाबजाम यांसारखे पारंपरिक गोड पदार्थ भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. अनेक गोड पदार्थांमध्ये दूध, तूप, सुका मेवा व गूळ यांसारखे पौष्टिक घटकही वापरले जातात. मात्र, गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे वजन वाढणे, रक्तातील साखर वाढणे आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भारतीय आहारात गोड पदार्थांचा आस्वाद जरूर घ्यावा; पण तो नेहमी संतुलित आणि मर्यादित प्रमाणात घेणेच आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

अनेकांना अचानक गोड खाण्याची तीव्र इच्छा (क्रेविंग) होते. जेवणानंतर, तणावाच्या काळात किंवा थकवा जाणवल्यावर अनेक जण चॉकलेट, मिठाई, आईस्क्रीम किंवा इतर गोड पदार्थांकडे वळतात. ही इच्छा नेहमीच भूक लागल्यामुळेच होते, असे नाही; काही वेळा झोपेची कमतरता, तणाव, हार्मोन्समधील बदल, अनियमित आहार किंवा रक्तशर्करेतील चढ-उतार यांमुळेही गोड खाण्याची क्रेविंग वाढू शकते. त्यामुळे वारंवार गोड खाण्याची इच्छा होत असल्यास, त्यामागील कारण समजून घेणे आणि संतुलित आहारासह आरोग्यदायी पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरते.

खरे तर, आपल्या आतड्यांमध्ये राहणारे सूक्ष्मजीव, त्यांना गट मायक्रोबायोम, असे म्हटले जाते. हे गट मायक्रोबायोम पचन, चयापचय (मेटाबॉलिझम), रोगप्रतिकारक शक्ती आणि अगदी भूक नियंत्रित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झाल्यास गोड पदार्थ खाण्याची इच्छा (क्रेविंग) वाढू शकते. आतड्यातील काही हानिकारक जीवाणू व यीस्ट साखरेवर वाढतात आणि शरीराला अधिक गोड खाण्यास प्रवृत्त करू शकतात. त्याशिवाय साखरेचे जास्त प्रमाण असलेला आहार घेतल्यास आतड्यातील उपयुक्त जीवाणूंची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे गट मायक्रोबायोमचे संतुलन अधिक बिघडते आणि गोड खाण्याची इच्छा वाढत राहण्याचे एक दुष्टचक्र (Unhealthy Cycle) तयार होऊ शकते.

२०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या International Journal of Environmental Research and Public Health या नियतकालिकातील एका अभ्यासानुसार, आतड्यातील चांगले आणि वाईट जीवाणू (गट मायक्रोबायोम) यांचे संतुलन बिघडल्यास फूड अॅडिक्शन (अन्नाचे व्यसन) किंवा विशिष्ट पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा (क्रेविंग) वाढू शकते. या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, आपण जे अन्न खातो, तेच आपल्या आतड्यातील जीवाणूंचेही पोषण करते. साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त, तर फायबरचे प्रमाण कमी असलेला पाश्चात्त्य आहार काही विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होण्यास पोषक ठरू शकतो. हे जीवाणू मेंदूला संकेत पाठवू शकतात, ज्यामुळे गोड किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा अधिक वाढू शकते.

चांगले गट बॅक्टेरिया आणि जीवनशैलीचा परिणाम

गट बॅक्टेरिया शॉर्ट-चेन फॅटी ॲसिड्स (SCFAs) तयार करण्यास मदत करतात. हे घटक आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावतात आणि पोट भरल्याची जाणीव करून देणाऱ्या हार्मोन्सच्या कार्यालाही मदत करतात. गट मायक्रोबायोम संतुलित असल्यास जेवल्यानंतर अधिक समाधानाची भावना निर्माण होऊ शकते आणि गोड पदार्थ किंवा स्नॅक्स खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत मिळू शकते.

याउलट, अपुरी झोप, सततचा ताण-तणाव आणि जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले (Processed) अन्न खाण्याची सवय यांमुळे गट मायक्रोबायोमवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची क्रेविंग वाढण्याची शक्यता असते. मात्र, गोड खाण्याची इच्छा ही केवळ गट बॅक्टेरियांमुळेच निर्माण होते, असे नाही. तर, त्यामागे अनेक जैविक, मानसिक आणि जीवनशैलीशी संबंधित घटकही कारणीभूत असू शकतात.