Pan Eating Benefits : भारतात जेवण झाल्यानंतर पान खाण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. बहुतांश लोक याकडे फक्त तोंडाची चव बदलण्यासाठी किंवा माउथ फ्रेश्नर म्हणून पाहतात. परंतु, आयुर्वेदानुसार योग्य पद्धतीने खाल्लेले पान हे एखाद्या औषधाहून कमी नाही. जर तुम्ही तंबाखू नसलेले साधे किंवा गोड पान खाल्ले, तर ते शरीरासाठी खरंच खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊयात जेवणानंतर पान खाण्याचे नेमके काय फायदे आहेत.

१) पचनक्रिया सुधारते

जेवण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही पान चावता, तेव्हा तोंडात लाळ (Saliva) तयार होण्याचे प्रमाण लगेच वाढते. या लाळेमध्ये विशेष पाचक एन्झाईम्स असतात, जे अन्न लवकर आणि सहज पचवण्यास मदत करतात. जड जेवणानंतर पान खाल्ल्याने पोटात जडपणा जाणवत नाही.

२) ॲसिडिटी आणि गॅसपासून आराम

मसालेदार किंवा जड जेवण केल्यानंतर अनेकदा छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवतात. अशा वेळी गोड पानातील अल्कलाईन गुणधर्म पोटातील ॲसिडचा प्रभाव कमी करतात. यामुळे ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येपासून लगेच आराम मिळतो.

३) तोंडाची दुर्गंधी आणि इन्फेक्शन होते दूर

गोड पानामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जेवणानंतर पान चावल्याने तोंडात लपलेले बॅक्टेरिया नष्ट होतात, जे कॅव्हिटी आणि श्वासाच्या दुर्गंधीचे मुख्य कारण असतात. हिरड्या मजबूत ठेवण्याचा आणि तोंड तासनतास ताजेतवाने ठेवण्याचा हा एक नैसर्गिक उपाय आहे.

४) चयापचय क्रिया सुधारते

खायचे पान शरीराचा मेटाबॉलिक रेट वाढवण्यास मदत करते. जेव्हा तुमचे मेटाबॉलिझम योग्य प्रकारे काम करते, तेव्हा अन्नाचे उर्जेमध्ये वेगाने रूपांतर होते आणि शरीरात अतिरिक्त चरबी (फॅट) जमा होण्याची शक्यता कमी होते. हे आतड्यांची स्वच्छता करून शरीराला डिटॉक्स करण्याचेही काम करते.

‘या’ गोष्टींची घ्या काळजी

तंबाखू , चुना आणि सुपारी टाळा: पानात तंबाखू, चुना किंवा सुपारी वापरू नका कारण ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे तोंडाचा कर्करोग (Cancer), दात खराब होणे आणि हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो.

गोड पानाचे अतिसेवन टाळा: बाजारात मिळणाऱ्या गोड पानात पाक, कृत्रिम रंग आणि अतिप्रमाणात साखर असते, ज्यामुळे वजन वाढू शकते. तसेच हे मधुमेहाच्या (Sugar) रुग्णांसाठी योग्य नाही.

गोड पानाला उत्तम पर्याय

घरी बनवलेले पान सर्वात उत्तम: तुम्ही घरच्या घरी देखील गोड पान बनवू शकता. घरी खायच्या पानात थोडी बडीशेप, ओले खोबरे, धना डाळ आणि थोडे गुलकंद घालून खाणे अधिक आरोग्यदायी ठरते.

सेवनाची वेळ आणि प्रमाण: दिवसातून एकदा जेवणानंतर एक पान खाणे पुरेसे आहे.