Sweet potato health benefits: रताळे ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रताळे हे पोषक घटकांनी भरलेलं एक कंद आहे, ज्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामध्ये पाणी, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, पोटॅशियम, मॅंगनीज ही खनिजे आणि आवश्यक ए, बी६, सी व ई ही जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो.
तसेच, बीटा कॅरोटीन, क्लोरोजेनिक अॅसिड, अँथोसायनिन्स व कौमरिन यांसारखी फायदेशीर वनस्पती संयुगे असतात. मग रताळ्याचा तुमच्या आहारात समावेश केल्याने आरोग्याला काय फायदे होतात, ते जाणून घेऊ…
रक्तशर्करेवर नियंत्रण
रताळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करते. कारण- त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ४४ ते ९६ दरम्यान आहे. त्याधील मँगनीज व कार्बोहायड्रेटमुळे मेटाबोलिझममध्ये मदत होते आणि त्यामुळे साखरेच्या पातळीत वाढ न होता, ती ती नियंत्रित राहते.
पचनासाठी उत्तम
रताळ्यामध्ये असलेल्या फायबर्समुळे ती पचनासाठी उत्तम असतात. त्यामध्ये सोल्युबल फायबर (soluble fiber) (१५-२३%) जसे की पेक्टिन आणि इनसोल्युबल फायबर (insoluble fiber) (७७-८५%) जसे की सेल्युलोज (cellulose) आणि लिग्निन (lignin) असतात. आरोग्य तज्ज्ञ दररोज २१-३८ ग्राम फायबर्सचे सेवन करण्याची शिफारस करतात; जेणेकरून गंभीर रोग टाळता येतील.
हृदयासाठी चांगले
रताळ्यांमधील बी६ हे जीवनसत्त्व हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. कारण- ते शरीरातील होमोसिस्टीनचे प्रमाण कमी करते, ज्याचा हृदयविकाराशी संबंध आहे. त्याव्यतिरिक्त त्यातल्या पोटॅशियममुळे द्रवसंतुलन राखले जाऊन रक्तदाब कमी होतो.
रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास पूरक
रताळे अँथोसायनाइड्स आणि कोलीन यांसारख्या त्यांच्यातील दाहविरोधी संयुगांद्वारे रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करू शकते. त्यातील लोहाचे प्रमाण ताण प्रतिरोधक क्षमता प्रदान करण्यास मदत करते, लाल व पांढऱ्या रक्तपेशींचे उत्पादन वाढवते आणि रोगप्रतिकारक कार्य करण्यास मदत करते.
कर्करोगाशी लढण्याची क्षमता
रताळ्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्याने, विशेषतः कॅरोटीनॉइड्समुळे कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म असतात; जे पोट, मूत्रपिंड व स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करतात, असे आढळून आले आहे. जांभळ्या रताळ्यांमध्ये विशेषतः ब्लूबेरीमध्ये आढळणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सपेक्षा तिप्पट अँटीऑक्सिडंट्स असतात.
भारतामध्ये रताळ्याचे उकडणे, भाजणे, वाफवणे किंवा तळणे अशा विविध प्रकारे तयार करून, सेवन केले जाते. त्यात लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे उपवासाचे महिने आणि सणाच्या वेळी हा खूप पसंतीचा पदार्थ ठरतो.