निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम हा सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. त्यामध्ये पोहणे (Swimming) आणि धावणे (Running) हे दोन सर्वाधिक लोकप्रिय कार्डिओ व्यायाम आहेत. दोन्ही व्यायाम हृदयाचे आरोग्य सुधारतात, कॅलरी बर्न करतात आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात. मात्र, तुमच्या फिटनेसच्या उद्दिष्टानुसार या दोन्हींपैकी कोणता व्यायाम अधिक फायदेशीर ठरेल? NCBI, Frontiers, American Council on Exercise आणि इतर संशोधनांनुसार जाणून घेऊया पोहणे आणि धावणे यातील फरक…
हृदयासाठी पोहणे चांगले की धावणे?
पोहणे आणि धावणे हे दोन्ही उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम आहेत. संशोधनानुसार नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींची हृदयाची कार्यक्षमता निष्क्रिय जीवनशैली असलेल्या लोकांपेक्षा अधिक चांगली असते.
काही अभ्यासांमध्ये धावणाऱ्या व्यक्तींचा रेस्टिंग हार्ट रेट किंचित कमी असल्याचे दिसून आले असले, तरी दोन्ही प्रकारच्या व्यायामामुळे हृदय मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी दोन्ही पर्याय प्रभावी मानले जातात.
कॅलरी बर्न करण्यासाठी कोणता व्यायाम अधिक प्रभावी?
साधारण ८० किलो वजनाच्या व्यक्तीने ३० मिनिटे व्यायाम केल्यास अंदाजे –
- आरामात पोहल्यास – २७७ कॅलरी
- वेगाने पोहल्यास – ३९६ कॅलरी
- ५ mph वेगाने धावल्यास – ३१७ कॅलरी
- ७ mph वेगाने धावल्यास – ४५६ कॅलरी
धावण्यामुळे अधिक कॅलरी खर्च होतात. मात्र, ज्यांना जास्त वेळ पोहता येते किंवा धावणे कठीण जाते, त्यांच्यासाठी पोहणेही तितकेच प्रभावी ठरू शकते.
वजन कमी करण्यासाठी पोहणे की धावणे?
वजन कमी करण्याचे उद्दिष्ट असेल, तर संशोधनानुसार धावणे अधिक प्रभावी ठरू शकते. समान वेळेत आणि समान तीव्रतेने व्यायाम केल्यास धावण्यामध्ये पोहण्याच्या तुलनेत सुमारे ४० टक्के अधिक कॅलरी बर्न होऊ शकतात.
मांसपेशी मजबूत करण्यासाठी कोणता व्यायाम?
धावण्याचा फायदा
- मांडी आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
- कूल्हे आणि काफ मसल्सवर अधिक काम होते.
- खालच्या शरीराची ताकद वाढते.
पोहण्याचा फायदा
- खांदे, पाठ, छाती आणि हातांचे स्नायू मजबूत होतात.
- पोटाचे स्नायू सक्रिय राहतात.
- जवळपास संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
हाडांसाठी कोणता व्यायाम अधिक फायदेशीर?
धावणे हा हाय-इम्पॅक्ट व्यायाम असल्यामुळे हाडांची घनता (Bone Density) वाढविण्यास अधिक मदत होऊ शकते. त्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यासाठी धावणे उपयुक्त मानले जाते. दुसरीकडे, पोहण्यामध्ये सांध्यांवर कमी ताण येतो. त्यामुळे संधिवात, गुडघेदुखी किंवा सांध्यांच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी पोहणे अधिक सुरक्षित पर्याय ठरतो.
दररोज पोहण्याचे फायदे
- संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
- हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारते.
- सांध्यांवरील ताण कमी राहतो.
- तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारते.
- वाढत्या वयातही फिट राहण्यास मदत होते.
दररोज धावण्याचे फायदे
- हृदय मजबूत राहते.
- वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- हाडे आणि पायांचे स्नायू मजबूत होतात.
- तणाव, चिंता कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते.
- हृदयरोग आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
मग नेमकं काय निवडावं?
जर तुमचं उद्दिष्ट वजन कमी करणं आणि कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न करणं असेल, तर धावणे अधिक फायदेशीर ठरू शकते. मात्र, सांध्यांचा त्रास, दुखापतीचा धोका किंवा संपूर्ण शरीराचा व्यायाम हवा असेल, तर पोहणे हा उत्तम पर्याय आहे. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जो नियमितपणे करू शकता आणि ज्यामध्ये आनंद मिळतो, तोच व्यायाम तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. गरजेनुसार फिटनेस प्रशिक्षकांचा सल्ला घेऊन योग्य व्यायाम निवडल्यास अधिक फायदा मिळू शकतो.
