राज्य सरकारचा निर्णय
गर्भारपणाच्या तिसऱ्या टप्प्यातील गर्भवतींना स्वाइन फ्लूची मोफत लस देण्याची योजना आता व्यापक करण्यात येत आहे. मधुमेही व उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनाही स्वाइन फ्लूची लस देण्यात येईल. राज्यात या वर्षी स्वाइन फ्लूने झालेल्या मृत्यूंपैकी ४३ टक्के व्यक्तींना या दोन्हीपैकी एक आजार होता. स्वाइन फ्लूच्या साथीने या वर्षी पुन्हा डोके वर काढले.
गर्भवती महिला तसेच मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार असलेले रुग्ण, वृद्ध व्यक्तींची प्रकृती स्वाइन फ्लूमुळे अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे राज्य सरकारकडून दहा कोटी रुपयांची तजवीज करून त्यातून स्वाइन फ्लूच्या तीन लाख लसी विकत घेण्याचा निर्णय झाला. त्यातील एक लाख लसी विकत घेण्यात आल्या आणि राज्यभरातील गर्भवतींना ही लस मोफत टोचण्याची सुरुवात झाली, मात्र नागपूरवगळता इतरत्र या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला.
मुंबईत पालिका रुग्णालयातून दिल्या जात असलेल्या लसींचा फायदा आतापर्यंत सुमारे दीड हजार स्त्रियांनी घेतला. आता हे लसीकरण व्यापक करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या वर्षी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या ८९८ व्यक्तींपैकी ३८४ व्यक्तींमध्ये आधीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे आजार होते. त्यामुळे अशा व्यक्तींनाही यापुढे मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कस्तुरबा या रुग्णालयातून तसेच प्रभादेवी, ओशिवरा व भांडुप येथील प्रसूतिगृहांमधून लसीकरण केले जात असून मधुमेही व रक्तदाबाच्या रुग्णांनाही येथून सेवा दिली जाणार आहे.