Knee Pain Symptoms: गुडघेदुखी ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या आहे. मात्र, प्रत्येक वेळी गुडघेदुखीकडे साधा त्रास म्हणून पाहणे योग्य नाही. गुडघ्याला अचानक सूज येणे, चालताना गुडघा लॉक होणे किंवा रात्री वेदनांमुळे झोपमोड होणे, ही काही गंभीर समस्यांची लक्षणे असू शकतात. हाडांचे तज्ज्ञ डॉ. देबाशीष चंदा यांनी गुडघ्याशी संबंधित अशाच तीन लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. ही लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
१. रात्री अचानक गुडघ्याला सूज येणे
रात्री झोपताना किंवा दिवसभरातील कामानंतर अचानक गुडघा सुजल्याचे जाणवले, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. गुडघ्याला आलेली सूज मेनिस्कसला दुखापत झाल्याचे लक्षण असू शकते. विशेष म्हणजे, काही वेळा दुखापत झाल्यानंतर लगेच सूज दिसत नाही. काही तासांनी किंवा दुसऱ्या दिवशी गुडघा सुजायला सुरुवात होते. यासोबत गुडघ्यात जडपणा जाणवणे, गुडघ्याच्या आजूबाजूला सूज दिसणे, गुडघा वाकवताना किंवा जिने चढताना वेदना होणे, तसेच गुडघ्यात ताण आणि आखडलेपणा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
२. चालताना अचानक गुडघा लॉक होणे
चालताना अचानक गुडघा अडकणे किंवा तो पूर्णपणे सरळ करता न येणे, हे मेनिस्कस टिअरचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. मेनिस्कसचा फाटलेला भाग त्याच्या मूळ जागेवरून सरकून गुडघ्याच्या सांध्यामध्ये अडकल्यास गुडघ्याच्या सामान्य हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा वेळी चालताना अचानक पाय अडकल्यासारखा वाटू शकतो. गुडघा पूर्णपणे सरळ करण्यात अडचण येते. गुडघा वाकवताना वेदना किंवा कट-कट असा आवाज येऊ शकतो. यामुळे चालणे, बसणे आणि उठणे यांसारख्या साध्या हालचालीही त्रासदायक ठरू शकतात.
३. रात्री गुडघेदुखीमुळे अचानक झोपमोड होणे
रात्री झोपेत असताना गुडघेदुखीमुळे अचानक जाग येत असेल, तर हे लक्षणही दुर्लक्षित करू नका. मेनिस्कसला दुखापत झाल्यास गुडघ्यात सतत वेदना आणि सूज राहू शकते. रात्री कुशी बदलताना किंवा पायाची स्थिती बदलताना वेदना वाढू शकतात. मेनिस्कस टिअरमुळे गुडघ्याच्या सांध्यावर दबाव येतो. सांध्याच्या आतील भागात सूज आणि जळजळ होऊ शकते. पाय वाकवताना किंवा फिरवताना दुखापत झालेल्या भागावर ताण येतो. त्यामुळे रात्रीही वेदना जाणवू शकतात.
गुडघ्याच्या या समस्यांमागे कोणती कारणे असू शकतात?
तज्ज्ञांच्या मते, गुडघ्याशी संबंधित अशा त्रासामागे मेनिस्कस टिअर, लिगामेंटला झालेली दुखापत, हाडांची झीज किंवा ऑस्टिओआर्थरायटिसचा अचानक वाढलेला त्रास अशी वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यामुळे गुडघ्यात सूज येणे, तो लॉक होणे किंवा रात्री तीव्र वेदना होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार घेणे सोपे होऊ शकते.
काय आहे मेनिस्कस? गुडघ्यासाठी का महत्त्वाचा असतो?
मेनिस्कस हा गुडघ्याच्या सांध्यामध्ये असणारा सी आकाराचा मजबूत कूर्चेचा (कार्टिलेज) भाग आहे. तो मांडीचे हाड आणि पायाच्या खालच्या भागातील हाड यांच्यामध्ये कुशनप्रमाणे काम करतो. चालताना, धावताना किंवा उड्या मारताना गुडघ्यांवर पडणारा दबाव कमी करण्याचे काम मेनिस्कस करतो. त्यामुळे गुडघ्याच्या हालचाली सुरळीत राहण्यास मदत होते. मात्र, दुखापत किंवा इतर कारणांमुळे मेनिस्कस फाटल्यास गुडघेदुखी, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
मेनिस्कस टिअरवरील उपचार दुखापतीची तीव्रता, रुग्णाचे वय आणि गुडघ्याची एकूण स्थिती यांवर अवलंबून असतात. काही प्रकरणांमध्ये औषधे आणि फिजिओथेरपीने आराम मिळू शकतो, तर गंभीर दुखापतीमध्ये शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.
