Kidney Disease Symptoms : किडन्या म्हणजे मूत्रपिंडे शरीरातील रक्त शुद्धीकरण करून टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव बाहेर काढण्याचे महत्त्वाचे काम करते. मूत्रपिंडांच्या कार्यावर परिणाम झाल्यास मूत्रपिंडाला तीव्र स्वरूपाची इजा (AKI) किंवा मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार (CKD) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.CKD हा हळूहळू वाढणारा आजार असून, तो प्रगतावस्थेत गेल्यानंतर मूत्रपिंडे निकामी होऊ शकतात. अशा वेळी काही रुग्णांना कृत्रिमरीत्या रक्त शुद्धीकरण (डायलिसीस) किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.
किडनीच्या आजाराची लक्षणे कोणती?
किडनीचा आजार म्हणजे मूत्रपिंडांशी संबंधित आजार सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाही. त्यामुळे केवळ लक्षणांवर अवलंबून राहणे योग्य नाही. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा कुटुंबात मूत्रपिंडे निकामी होण्याचा इतिहास असल्यास नियमित तपासणी महत्त्वाची आहे.
आजार प्रगत झाल्यास दिसू शकतात खालील लक्षणे:
- सतत थकवा किंवा अशक्तपणा
- पाय, घोटे किंवा शरीराच्या इतर भागांवर सूज
- श्वास घेण्यास त्रास
- त्वचेवर खाज येणे किंवा त्वचा कोरडी होणे
- भूक कमी होणे
- मळमळ किंवा उलट्या
- स्नायूंमध्ये गोळे येणे
- लघवीच्या प्रमाणात किंवा वारंवारतेत बदल
- काही वेळा फेसाळ लघवी
ही लक्षणे इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तीव्र मूत्रपिंड इजा (AKI) म्हणजे काय?
Acute Kidney Injury (AKI) म्हणजे काही तास किंवा दिवसांत किडनीच्या कार्यात अचानक झालेली घट. त्यामागे शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता, गंभीर संसर्ग, मोठी शस्त्रक्रिया, दुखापत, गर्भधारणेशी संबंधित काही गुंतागुंत किंवा मूत्रपिंडांना हानी पोहोचवणारी काही औषधे यांसारखी कारणे असू शकतात. योग्य वेळी उपचार मिळाल्यास AKI अनेकदा सुधारू शकते.
AKI चा धोका कमी करण्यासाठी : शरीरातील पाण्याची कमतरता टाळणे, गंभीर संसर्गावर वेळेवर उपचार घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मूत्रपिंडांना हानी पोहोचवू शकणारी औषधे न घेणे महत्त्वाचे आहे.
मूत्रपिंडाचा दीर्घकालीन आजार (CKD) म्हणजे काय?
Chronic Kidney Disease (CKD) म्हणजे किडनीच्या कार्यात किंवा तिच्या रचनेत दीर्घकाळ राहणारा बिघाड. मधुमेह व उच्च रक्तदाब ही CKD ची प्रमुख कारणे आहेत. त्याशिवाय हृदयरोग, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, काही आनुवंशिक आजार, काही औषधे, विषारी पदार्थ आणि संसर्ग यांचाही संबंध असू शकतो.
CKDचा धोका कसा कमी कराल?
- रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
- मधुमेह असल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा.
- नियमित शारीरिक हालचाल करा.
- निरोगी वजन राखा.
- तंबाखूचे सेवन टाळा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचा दीर्घकाळ वापर करू नका.
- धोका जास्त असल्यास नियमित रक्त आणि लघवीच्या तपासण्या करा.
