Walking After Dinner :जेवणानंतर अवघ्या १० मिनिटे चालण्याची ही सवय केवळ फिटनेसपुरती मर्यादित न राहता अनेक गंभीर आजारांवर प्रभावी ठरू शकते. मधुमेह, वजनवाढ, फॅटी लिव्हर, पचनाचे विकार ते मानसिक ताणतणाव अशा विविध समस्यांवर चालणे उपयुक्त असल्याचे वैद्यकीय संशोधनातून स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांच्या मते, जेवणानंतरची ही छोटीशी शतपावली आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकते.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त
जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ही सवय फायदेशीर ठरते. जेवणानंतर चालल्यामुळे स्नायू रक्तातील साखर ऊर्जेच्या रूपात वापरतात. त्यामुळे स्वादुपिंडावर इन्सुलिन तयार करण्याचा ताण कमी होतो आणि शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. याचा परिणाम म्हणून गोड जेवणाची तीव्र इच्छा देखील कमी होते.
वजन आणि फॅटी लिव्हरवर सकारात्मक परिणाम
दररोज जेवणानंतर दहा मिनिटे चालल्यास कॅलरी खर्च वाढतो आणि चरबी साठण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. याचबरोबर यकृतामध्ये साठणारी अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. फॅटी लिव्हरची समस्या असलेल्या व्यक्तींनी ही सवय अंगीकारल्यास उपचारास पूरक लाभ होऊ शकतो.
पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते
जेवणानंतर चालल्याने आतड्यांची हालचाल वाढते. त्यामुळे अन्न पचनक्रिया सुरळीत होते. पोट फुगणे, गॅस, आम्लपित्त यांसारख्या तक्रारी कमी होतात. नियमित चालणाऱ्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास कमी जाणवतो. पचनसंस्थेसाठी ही सवय एक प्रकारे नैसर्गिक औषध ठरते.
मानसिक आरोग्य आणि झोपेवर परिणाम
रात्रीच्या जेवणानंतर थोडी चालल्यास ताणतणाव कमी होण्यास मदत होते. चालताना मेंदूमध्ये आनंददायी हार्मोन्स स्रवतात, त्यामुळे मानसिक प्रसन्नता वाढते. तसेच झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, ज्यामुळे झोप अधिक गाढ आणि शांत लागते.
हृदय आणि रक्तदाबासाठी फायदेशीर
जेवणानंतर चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. धमन्यांमधून रक्तप्रवाह सुरळीत होतो, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. नियमित चालणे ही हृदयरोगाचा धोका कमी करण्याचा सोपा आणि किफायतशीर उपाय मानला जातो.
चालण्याची योग्य पद्धत
- चालण्याचा लाभ मिळण्यासाठी योग्य वेळ आणि पद्धत महत्त्वाची आहे.
- जेवण झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांत चालणे सुरू करावी.
- फार वेगाने न चालता सहज, आरामशीर गतीने चालणे अधिक उपयुक्त ठरते.
- चालताना शरीर ताठ ठेवावे, मान आणि खांदे सैल ठेवावेत, त्यामुळे श्वसन सुधारते.
दररोजची दहा मिनिटांची चाल ही सवय आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकते. औषधांइतकीच प्रभावी ठरू शकणारी ही नैसर्गिक उपाययोजना प्रत्येकाने आपल्या दिनक्रमात समाविष्ट करणे काळाची गरज आहे.
टीप-वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.

