सध्या पाऊस चांगलाच जोरात आहे आणि निरनिराळ्या तापांच्या साथीही तितक्याच वेगाने पसरतायत. ताप हा आजार नसून आजाराचे एक लक्षण असते. तापाचे कारण कुठलाही आजार असू शकतो. अनेकांना असे वाटते की ताप आला म्हणजे साधा फ्लू असेल आणि दोन तीन दिवसात आपोपाप बरा होईल. पण सध्या मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, युरिन इन्फेक्शन, कावीळ असे एक प्रकारे वैद्यकीय औषधोपचाराने बऱ्या होणाऱ्या पण काहीशा गंभीर आजारांच्या अनेक केसेससुध्दा दिसून येतात.
साहजिकच ताप आल्यावर दोन-तीन दिवसांनी बघू, असे म्हणून डॉक्टरांकडे उपचाराला जायला दिरंगाई करण्याचे टाळावे. कुठलाही ताप असला, तरी तापाच्या दरम्यान, रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे घेण्याबरोबर स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात काही पथ्ये सांभाळणे आवश्यक असते. ही पथ्ये सर्व प्रकारच्या तापांना लागू पडतात. ती काटेकोरपणे सांभाळल्यास डॉक्टरांच्या औषधांनी रुग्णांना लवकर बरे वाटते.




१. पूर्ण विश्रांती- कुठलाही ताप आल्यास कामातून, शाळा-कॉलेजातून रजा घेऊन पूर्ण विश्रांती घ्यावी. विश्रांती न घेतल्यास तुमचा आजार जास्त काळ रेंगाळेल. फ्लूसारख्या आजारात कामाला किंवा शाळा-कॉलेजात गेल्यास, इतरांना तो होण्याची शक्यता असते.
२. आंघोळ – ताप असला तरी गरम पाण्याने स्वच्छ आंघोळ करावी. आंघोळीमुळे ताप वाढत नाही, उलट आंघोळीनंतर घाम येऊन ताप उतरू शकतो. शिवाय घामेजलेल्या शरीराची दुर्गंधी जाऊन ‘फ्रेश’ वाटते.
३. आहार- कुठल्याही तापात तोंडाला चव नसते, त्यामुळे अन्नावर वासना नसते. साहजिकच तापात रुग्ण अन्न घ्यायला टाळाटाळ करतात. त्यामुळे तापाने आलेला अशक्तपणा जास्त वाढतो. शिवाय पोटात दुखणे, उलट्या होणे, गरगरणे, मळमळणे, चक्कर येणे असे त्रास उद्भवतात. तापात वरण-भात, खीर, दूध-पोहे असा हलका आहार घेतल्यास अशक्तपणा कमी जाणवतो. त्यामुळे ताप आला तरी खाणे टाळू नये. अन्न खाणे गरजेचे, नुसते फळांचे रस घेतल्यास अशक्तपणा कमी होत नाही.
४. पाणी- तापामुळे शरीरातील पाणी कमी होत जाते. साहजिकच नेहमीपेक्षा जास्त पाणी प्यावे, अन्यथा कमालीचा थकवा, चक्कर येण्याचे त्रास वाढू शकतात. डीहायड्रेशन, लघवीचे प्रमाण कमी होणे, मूत्रपिंडांवर ताण येणे असे गंभीर विकार होतात. पाण्याप्रमाणेच ताज्या फळांचे रस, सरबते, शहाळी घ्यावीत. मात्र थंड पाणी, शीतपेये टाळावीत.
५. कपडे – तापामध्ये सैल आणि सुती कपडे घालावेत. ते दिवसातून दोनदा किंवा किमान रोजच्या रोज बदलावेत. घट्ट आणि सिंथेटिक कपड्यांमुळे अस्वस्थता वाढते.
६. इतर गोष्टी – सर्दी-खोकल्याच्या आजारात गरम पाण्याच्या गुळण्या करणे, लहान मुलांना ताप असताना दिवसातून दोनतीनदा स्पंजिंग करणे, थंडी वाजत असल्यास गरम कपडे वापरणे या गोष्टी कराव्यात.
डॉ. अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन